मुंबई | नालासोपारामध्ये सापडलेल्या शस्त्रसाठ्याप्रकरणी शरद कळसकर, वैभव राऊत आणि सुधन्वा गोंधळेकर या तिघांना आज आणखी दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आज शनिवारी या तिघांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायाधीश विनोद पाडळकर यांनी तिन्ही आरोपींना 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

हिंदू दहशतवाद पसरवत असल्याच्या संशयाखाली अटक करण्यात आलेल्या या तिन्ही आरोपींना या संपूर्ण प्रकरणाच्या गंभीरतेची कल्पना होती, हे आत्तापर्यंतच्या तपासातून समोर आलंय. त्यांच्याकडून आत्तापर्यंत हस्तगत करण्यात आलेला शस्त्रसाठा आणि इतर साहित्य हे याप्रकरणी अधिक खोलात तपास करण्याची गरज असल्याचं सिद्ध करण्यास पुरेसं आहे, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण यावेळी न्यायालयानं व्यक्त केलं.

आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार एटीएसनं नालासोपारा, पुणे आणि सोलापूर इथं पुन्हा छापेमारी केली. त्यात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून गावठी पिस्तुलं, गोळ्या इत्यादी शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. प्रसाद देशपांडे नाव्याच्या व्यक्तीकडून या गोष्टी हस्तगत केल्याचं कोर्टाला सांगण्यात आलं. तसेच पुण्यातील पर्वती इथून काही सीसीटिव्ही फुटेज, तीन वाहनांच्या नंबर प्लेट्स आणि सुधन्वा गोंधळेकरच्या ऑफिसमधून काही आक्षेपार्ह लिखाण साहित्यही हस्तगत केल्याचं यावेळी कोर्टाला सांगण्यात आलं.

त्यामुळे या प्रकरणी नेमका या तिघांचा हेतू काय होता? कुठे आणि कधी घातपात करायचा होता? या संपूर्ण प्रकरणामागील खरे सुत्रधार कोण आहेत? याची माहिती काढणं गरजेचं आहे. त्यामुळे या तिन्ही आरोपींकरता 15 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. मात्र कोर्टानं त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.

वैभव राऊतच्या समर्थनार्थ हिंदूत्ववादी संघटनांचा मोर्चा

स्फोटकं सापडल्याप्रकरणी एटीएसनं अटक केलेल्या आरोपी वैभव राऊतच्या समर्थनार्थ काल शुक्रवारी विविध हिंदूत्ववादी संघटनांनी नालासोपाऱ्यात निषेध मोर्चा काढला. हजारोंच्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. वैभवला पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अटक केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. नालासोपारा बस आगारावरील रस्त्यावर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. दरम्यान एटीएस आज वैभव राऊतला  न्यायालयात हजर करणार आहे.