मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमीत्त त्यांच्यावर शुभचेच्छांचा वर्षाव होत आहे. पवार यांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील आपल्या आजोबांना शुभेच्छा देण्यासाठी एक पत्र लिहलं आहे. या तीन पानी पत्रात त्यांनी शरद पवार यांना भावनिक साद घातली आहे. राजकीय, सामाजिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यातील साहेबांसोबतचे अनेक किस्से रोहित पवार यांनी या पत्राद्वारे मांडले आहे. तसेच रोहित पवार यांनी आपल्या आजोबांसोबतच्या अनेक आठवणींना या पत्रातून उजाळा दिला आहे.
शरद पवार यांना लिहीलेल्या या पत्राद्वारे आ. रोहित पवार यांनी एक विनंती देखील केली आहे. यामध्ये ते म्हणतात, ''तुमच्याकडं दांडगा अनुभव आहे. मी माझ्या कामानिमित्त बऱ्याचदा तरुणांना भेटत असतो, त्यामुळं त्यांच्या अपेक्षा मला माहित आहेत. आपल्या दांडग्या अनुभवाची शिदोरी आज या तरूण वर्गाला शिकण्यासाठी हवीय. मग ती लेखाच्या अथवा पुस्तकाच्या माध्यमातून असो किंवा तरुणांसोबत संवाद साधण्याच्या एखाद्या कार्यक्रमाच्या माध्यमातून असो, आपण ती द्यावी, अशी या तरुण वर्गाचा एक प्रतिनिधी म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे." अशा भावना आ. रोहित पवार यांनी मांडल्या आहेत. आज सकाळी मुंबई येथे आ.रोहित पवार यांनी हे पत्र शरद पवार यांना त्यांच्या 80 व्या वाढदिवसानिमीत्त भेट स्वरूपात देत शुभेच्छा दिल्या.
म्हणून लिहलं पत्र..
'आदरणीय साहेब तुम्हाला काय भेट द्यावी, असा खूप विचार केला. पण काही सुचत नव्हतं. तुमची वाचनाची आवड पाहून एखादं पुस्तक भेट देण्याचा विचार केला, पण तुमचा व्यासंग पाहता ते तुम्ही आधीच वाचलेले असेल, अशी मला खात्री आहे, आणि तुम्ही स्वतः एक चालताबोलता संदर्भग्रंथ आहात, म्हणून पुस्तकाचा विचार मागे पडला आणि यंदाच्या दिवाळीत तुम्ही तुमच्या आईला म्हणजेच माझ्या पणजीला (कै. शारदाबाई पवार) यांना लिहिलेले पत्र अचानक आठवलं. यातून तुमच्या जडणघडणीत आईवडिलांचे जे स्थान आहे, याबाबतच्या हृद्य भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या. खरं तर तुमच्या बाबतीत माझ्या मनात तशाच भावना आहेत. या भावना मांडाव्यात असा विचार मनात आला आणि तुमच्याबद्दल नेहमीच एक आदरयुक्त भीती वाटत असल्याने माझ्या भावना पूर्णपणे व खुलेपणाने व्यक्त करता येणार नाहीत, म्हणून मी हे पत्र लिहितोय,' असं रोहित पवार यांनी पत्रात म्हटलं आहे.
संबंधित बातम्या :
... तेव्हा शरद पवारच पंतप्रधानपदाचे उमेदवार पण 'दरबार राजकारणात' संधी हुकली : प्रफुल पटेल
Photo | राजकारणातील 'यारों के यार', 80 वर्षाचे 'तरुण' राजकारणी शरद पवार
Sharad Pawar Birthday | ...म्हणून शरद पवार यांना जाणता राजा म्हणतात : जयंत पाटील