Rickshw-Taxi Fare Hike : मुंबईकरांच्या (Mumbaikar) खिशाला आता 1 ऑक्टोबरपासून कात्री लागणार आहे. आधीच महागाई त्यात मुंबईत (Mumbai) रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ एक ऑक्टोबरपासून होणार आहे. मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षाचालक-मालक गेल्या काही दिवसांपासून भाडेवाढ करण्यासाठी आग्रही होते. सीएनजीचे भाव वाढत आहेत. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी चालकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच गेल्या काही महिन्यांपासून भाडेवाढ करण्यासाठी टॅक्स आणि रिक्षाचालक मागणी करत होते. त्यात शुक्रवारी रिक्षा, टॅक्सीचालकांची राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक झाली आणि या बैठकीत भाडेवाडी संदर्भात सरकारकडून रिक्षा, टॅक्सीचालकांना हिरवा कंदील मिळाला आहे.
ही भाडेवाढ कशी असेल पाहूया...
टॅक्सीच्या किमान भाड्यात तीन रुपयांनी तर रिक्षाच्या भाड्यात दोन रुपयांनी वाढ होणार आहे
दिवसा
आता टॅक्सीचे किमान भाडे 25 रुपयांवरुन 28 रुपये होणार
तर रिक्षाचे भाडे 21 रुपयांवरुन 23 रुपये होणार
रात्रीचे
टॅक्सीचे रात्रीचे भाडे आता 32 रुपयांवरुन 36 रुपये होणार
तर रिक्षाचे रात्रीचे भाडे 27 रुपयांवरुन 31 रुपये होणार
'एमएमआरटीए' आज भाडेवाढीला अंतिम मंजुरी देणार
मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून (एमएमआरटीए) या भाडेवाढीला मंजुरी देण्यात येते. त्यामुळे सरकारकडून तत्त्वत: मंजुरी मिळाल्यानंतर 'एमएमआरटीए' भाडेवाढीला अंतिम मंजुरी आज देणार आहे, अशी माहिती टॅक्सी युनियनने दिली आहे. त्यामुळे आपल्या मागण्यांसाठी टॅक्सी आणि रिक्षाचालक मालक आज संप करणार होते तो संप टळला आहे. मात्र भाडे वाढ करताना इलेक्ट्रॉनिक मीटर पुनर्निर्धारित करुनच रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ अंमलात आणावी, अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतीने शासनाकडे केली आहे.
शासनाकडे झालेल्या मागणीनुसार आणि कोर्टाच्या निर्देशानुसार रिक्षा टॅक्सीची भाडे इलेक्ट्रॉनिक मीटर पुनर्निर्धारित करुनच आम्ही करणार आहोत, असे रिक्षा आणि टॅक्सी युनियनकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता जी भाडेवाढ होणार आहे, त्यानुसारच प्रवासासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.
VIDEO : Rickshaw Taxi Fare Hike : 1 ऑक्टोबरपासून मुंबईत रिक्षा,टॅक्सीचा प्रवास महागणार
संबंधित बातम्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रिक्षा-टॅक्सी चालक मालक महामंडळ स्थापन करणार