मुंबई : अधिक प्रभावी नियोजन व संनियंत्रणासाठी कंटेन्मेंट झोनची पुनर्रचना करण्यात आली आहे. 'कंटेन्मेंट झोन' व्यतिरिक्त 'सीलबंद इमारत' (Sealed Building) अशी आणखी एक नवी वर्गवारी निर्धारित आहे.  या सुधारित पुनर्रचनेनुसार महापालिका क्षेत्रात आता 661 'कंटेन्मेंट झोन' असून 1 हजार 110 'सीलबंद इमारती' असल्याचे घोषित करण्यात आले आहे. ज्यामुळे महापालिकेच्या मनुष्यबळासह पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचेही अधिक प्रभावी नियोजन व व्यवस्थापन शक्य होणार आहे.


ज्या भागात बाधित रुग्ण आढळून आला आहे; ते भाग यापूर्वी सरसकटपणे 'कंटेन्मेंट झोन' म्हणून घोषित करुन त्या भागावर अधिक काटेकोर देखरेख ठेवली जात असे. यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांसह पालिका कर्मचाऱ्यांची नेमणूकही करण्यात येत असे. मात्र एकाच परिसरातील एकापेक्षा अधिक इमारतींना किंवा भागांना 'कंटेन्मेंट झोन' म्हणून घोषित केल्यामुळे पोलिसांच्या व महापालिकेच्या स्तरावर मनुष्यबळाचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यास अडचणी येत होत्या.

ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिलेल्या निर्देशांनुसार कंटेन्मेंट झोन' व्यतिरिक्त 'सीलबंद इमारती' ही आणखी एक वर्गवारी आता निर्धारित करण्यात आली आहे. त्याचबरोबर 'कंटेनमेंट झोन'ची अधिक सुयोग्य व अधिक संयुक्तिक पुनर्रचना देखील करण्यात आली आहे. सीलबंद इमारती आणि कंटेनमेंट झोन भागांच्या प्रभावी संनियंत्रणासाठी लोकसहभाग वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.

सीलबंद इमारती
एखाद्या परिसरातील एका इमारतीमध्ये एक बाधित रुग्ण किंवा काही संशयित रुग्ण अथवा लक्षणे नसलेले रुग्ण आढळून आले असल्यास अशा इमारतीला किंवा त्या इमारतीच्या भागाला 'सीलबंद' म्हणून घोषित करण्यात येईल. हे करताना बाधित (पॉझिटिव्ह) रुग्ण रहात असलेल्या सदनिकेची व इमारतीची परिस्थिती लक्षात घेऊन सदर इमारत किंवा इमारतीचा काही भाग 'सीलबंद' म्हणून घोषित करण्यात येईल.

अशा इमारतीच्या /सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीस याची माहिती देण्यात येईल. त्याचबरोबर सोसायटीतील इतर व्यक्तींना बाधा होऊ नये, यासाठी राबवावयाच्या खबरदारीच्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन महापालिकेच्या आरोग्य खात्याद्वारे देण्यात येईल.

घोषित करण्यात आलेल्या सीलबंद इमारतींच्या स्तरावर करण्यात येणारी कार्यवाही ही प्रामुख्याने सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीच्या किंवा सोसायटीने निश्चित केलेल्या सदस्यांच्या समितीच्या पुढाकाराने केली जाणार आहे. या समितीला महापालिकेच्या संबंधित अधिकारी व कर्मचारी वर्गाचे मार्गदर्शन व सहकार्य वेळोवेळी नियमितपणे उपलब्ध करून दिले जाणार आहे.

सीलबंद इमारतीच्या बाबत निर्धारित करण्यात आलेल्या समितीद्वारे स्थानिक किराणा दुकानदार, भाजीविक्रेते, मेडिकल दुकान इत्यादींशी संपर्क साधून सोसायटीच्या गरजांनुसार वस्तूंची वा सामानाची मागणी नोंदवली जाणार आहे. 'ऑर्डर' दिलेल्या सामानाची किंवा वस्तूंची 'डिलिव्हरी' ही सोसायटीच्या 'एन्ट्री गेट'वर दुकानदारांद्वारे वा विक्रेत्यांद्वारे दिली जाणार आहे. त्यानंतर ऑर्डरनुसार सोसायटी सदस्याच्या दरवाज्यापर्यंत वस्तूची डिलिव्हरी करण्याची व्यवस्था ही सोसायटीच्या समिती द्वारे केली जाणार आहे.

अशा सोसायटीतील ज्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला 'क्वारंटाईन' करण्यात आले आहे, किंवा जी व्यक्ती बाधित असून जिला लक्षणे नसल्यामुळे घरच्या घरीच 'क्वारंटाईन' करण्यात आले आहे; अशा व्यक्तींच्या भ्रमणध्वनीमध्ये ' आरोग्य सेतु ॲप' इन्स्टॉल करवून घेण्याची कार्यवाही करण्याबाबत समितीचा पुढाकार व सहकार्य अपेक्षित असेल.

तसेच आवश्यकतेनुसार औषधी व सामान 'क्वारंटाईन' करण्यात आलेल्या व्यक्तींच्या घराच्या दरवाजापर्यंत वेळेवर पोचतील, याचे नियोजन आणि व्यवस्थापन संबंधित समिती सदस्यांनी करावयाचे आहे. त्याचबरोबर सदर सोसायटीतील एखाद्या व्यक्तीला 'कोरोना कोविड 19'ची लक्षणे आढळून आल्यास त्याची माहिती महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना कळविण्याची दक्षता देखील समिती सदस्यांनी घ्यावयाची आहे.

'कंटेन्मेंट झोन'ची पुनर्रचना
महापालिका आयुक्त महोदयांच्या आदेशानुसार अधिक प्रभावी संनियंत्रणासाठी 'कंटेन्मेंट झोन'ची पुनर्रचना करताना एकाच परिसरातील एकापेक्षा अधिक इमारती किंवा एकापेक्षा अधिक भाग वा घरे 'कंटेनमेंट झोन' म्हणून घोषित करण्यात आली असल्यास, आता अशा परिसरांना एकच 'कंटेनमेंट झोन' असल्याचे निर्धारित करण्यात आले आहे. या परिसरात जाणाऱ्या मार्गांवर निर्बंध घालण्यात आले असून तेथे पोलिस दल तैनात करण्यात आले आहे.

त्यामुळे आता प्रत्येक इमारतीवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्रपणे पोलिसांची नियुक्ती करण्याऐवजी, कमी मनुष्यबळात अधिक प्रभावी काम करणे शक्य होणार आहे. पोलीस दलाबरोबरच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी देखील या परिसरात जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यासह इतर बाबींचे नियोजन देखील करीत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या मनुष्यबळाचे अधिक चांगले व्यवस्थापन करणे देखील या निर्णयामुळे आता शक्य होणार आहे.

याआधी महापालिका क्षेत्रात 2 हजार 801 'कंटेनमेंट झोन' होते. आता सुधारित व संयुक्तिक पुनर्रचनेनुसार महापालिका क्षेत्रात 661 'कंटेनमेंट झोन' घोषित करण्यात आले आहेत. त्यामुळे पोलीस व महापालिका मनुष्यबळाचे अधिक प्रभावी नियोजन करणे आता शक्य होणार आहे. तसेच परिसरावर यथायोग्य देखरेख ठेवणे देखील अधिक चांगल्या प्रकारे करणे शक्‍य होणार आहे

'कंटेनमेंट झोन'ची पुनर्रचना सीलबंद इमारतींचे निर्धारण याबाबत महापालिकेने विशिष्ट कार्यपद्धती (Protocol) निश्चित केली आहे.

अशी असेल महापालिकेची नवी विशिष्ट कार्यपद्धती

  • पॉझिटिव्ह व लक्षणे असणाऱ्या रुग्णांना 'डी सी एच सी' किंवा 'डी सी एच' उपचार केंद्रात दाखल करण्यात येईल. डॉक्टरांच्या व महापालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार आणि रुग्णाच्या क्षमतेनुसार संबंधित रुग्णास खाजगी किंवा सार्वजनिक वैद्यकीय सुविधेत पाठविले जाईल.

  • जेव्हा एखाद्या इमारतीमध्ये बाधित रुग्ण आढळून येईल, तेव्हा बाधित रुग्ण रहात असलेल्या सदनिकेची परिस्थिती शौचालयांची संख्या, इमारतीची परिस्थिती यादी बाबी लक्षात घेऊन इमारत किंवा इमारतीचा भाग सीलबंद म्हणून घोषित करण्यात येणार आहे. अशा इमारतींमध्ये प्रवेश करण्यावर व बाहेर जाण्यावर प्रतिबंध असणार आहे.

  • केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार बाधित असणारे परंतु लक्षणें असणाऱ्या रुग्णांना घरच्या घरीच 'क्वारंटाईन' (Home Quarantine) केले जाणार आहे. या रुग्णांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर ' आरोग्य सेतु ॲप' इन्स्टॉल करणे आवश्यक आहे.

  • बाधित रुग्णांच्या घरातील व्यक्ती, शेजारपाजारच्या किंवा त्याच मजल्यावरील व्यक्ती, तसेच बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती यांना देखील घरच्या घरीच 'क्वारंटाईन' केले जाणार आहे. या अनुषंगाने शिक्का मारण्याची (स्टॅम्पिंग) करण्याची कार्यवाही बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे केली जाणार आहे. निकटच्या संपर्कातील 'क्वारंटाईन' करण्यात आलेल्या व्यक्तींना देखील त्यांच्या भ्रमणध्वनीवर ' आरोग्य सेतु ॲप' इन्स्टॉल करणे आवश्यक आहे.

  • लक्षणे असलेले बाधित रुग्ण आणि घरच्या घरी 'क्वारंटाईन' करण्यात आलेल्या व्यक्ती, यांच्याद्वारे आणि आणि सोसायटीतील इतर सदस्य व रहिवाशांद्वारे संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन होत असल्याची खातरजमा समितीद्वारे वेळोवेळी करण्यात येईल. यामध्ये सोसायटीतील सर्व सदस्यांद्वारे 'फिजिकल डिस्टन्सिंग', मास्क वापरणे, काटेकोरपणे स्वच्छता पाळणे यासारख्या बाबींचा समावेश आहे.

  • सोसायटी परिसरात कोणत्याही विक्रेत्यास, घरकाम करणाऱ्या व्यक्तीस, कपडे धुऊन देणाऱ्या व्यक्तीस किंवा इतर कोणतीही सेवा देणाऱ्या व्यक्तीस प्रवेश करण्यास मज्जाव असेल.

  • सोसायटी परिसरात वैद्यकीयp व्यवसायिक राहत असल्यास त्यांनी त्यांच्या सोसायटीतील इतर सदस्यांची कोरोनाच्या अनुषंगाने जाणीवजागृती करणे अपेक्षित असेल.