मुंबई : कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून उपाययोजना सुरु केल्या आहेत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोविडच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. सप्टेंबर अखेरपर्यंत कोविड रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध कडक होणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. 


तूर्तास नाईट कर्फ्यु, संचारबंदी,जमावबंदीची गरज नाही


कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना नाईट कर्फ्यू, संचारबंदी जमाव बंदी लागू केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र तूर्तास नाईट कर्फ्यु, संचारबंदी,जमावबंदीची गरज नाही, असं अस्लम शेख यांनी सांगितलं. टास्क फोर्सने सांगितल्यानुसार सप्टेंबर अखेरपर्यंत कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध कडक करण्याची गरज आहे, असंही त्यांनी म्हटलं. 


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत रविवारी टास्क फोर्सची 'माझा डॉक्टर' ऑनलाईन वैद्यकीय परिषद, राज्यातील सर्व डॉक्टर्स होणार सहभागी


...तर निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही


रुग्णसंख्येत स्पाईक दिसला तर निर्बंध कठोर होणार आहेत. त्यामुळे राज्य शासनाच्या नियमावलीचं तंतोतंत पालन झालं तर निर्बंध लाण्याची वेळ येणार नाही. पण, सध्या ठिकठिकाणी गर्दी वाढताना दिसतेय. अमेरिका, युरोपमध्ये लसीच्या दोन डोसनंतरही रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे काळजी घेण्याची घरज याहे, असं अस्लम शेख यांनी म्हटलं. 


लोकांच्या जीवाशी खेळून सण साजरे करणं कितपत योग्य?


सण हिंदुचे असो की इतर कोणत्या धर्माचे हे बघून कोविडच्या विषाणूची लागण होत नाही. लोकांच्या जीवाशी खेळून सण साजरे करणं कितपत योग्य आहे, असा आग्रह करणं कितपत योग्य हे त्यांनीच ठरवावं, असा टोलाही अस्लम शेख यांनी राज ठाकरे यांना लगावला. मंदिरांबाबत योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल. परिस्थिती नियंत्रणात आली की सर्वधर्मियांसाठी निर्णय घेऊ, असं आश्वासनही अस्लम शेख यांनी दिलं. 


संबंधित बातम्या