मुंबई : मुंबईतील अतिशय उच्चभ्रू लोकांची वस्ती आणि वावर असलेल्या दक्षिण मुंबईतील प्रियदर्शनी पार्क येथे चालणाऱ्या योग आणि मेडिटेशनच्या वर्गांना प्राप्तीकर खात्याने पाठवलेल्या 5 लाखांच्या नोटिशीला तिथल्या रहिवासी संघटनेने हायकोर्टात आव्हानं दिलं आहे.
योगवर्ग हे अर्थखात्यातील करप्रणालीप्रमाणे हेल्थ अँड फिटनेस सर्विसेस यात मोडतात का? असा सवालही उपस्थित केला आहे. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरू आहे.
साल 2015 कल्टम, एक्साईज अँड सर्विस टॅक्स अॅपिलेट ट्रब्युनलने प्रियदर्शनी पार्कमधील मोकळ्या जागेत चालणाऱ्या योगवर्ग, मेडिटेशन आणि अँरोबिक्स या सेवांसाठी 5 लाख रूपये भरण्याची नोटीस पाठवली होती.
मात्र याला विरोध करत रहिवासी संघटनेने न्यायालयात दाद मागितली. संघटनेच्या दाव्यानुसार यापूर्वी हा भाग ओसाड पडलेला होता. स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेऊन इथे जॉगिंग ट्रॅक आणि टेनिस कोर्ट उभारलं.
टेनिस कोर्टसाठी संघटना सेवाकर अदा करते. मात्र मोकळ्या जागेतील योगवर्ग हे सर्विस टॅक्सच्या व्याख्येत बसत नाही. त्यामुळे त्यावर टॅक्स लावण चुकीचं असल्याचा दावा करण्यात आला आहे. हायकोर्टाने तूर्तास यावरील सुनावणी 2 आठवड्यांसाठी तहकूब केली.