मुंबई : फेरीवाल्यांवरुन राज्यभरात आंदोलन छेडणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेरच आता फेरीवाले बसणार आहेत. फेरीवाला धोरणानुसार हॉकर्स झोन तयार करण्यात आले असून  त्यापैकी एक हॉकर्स झोन हा राज ठाकरे यांच्या घरासमोर आणि घराच्या मागच्या बाजूला असणार आहे.


एम. बी. राऊत आणि केळुसकर मार्ग या दोन्ही रस्त्यांवर प्रत्येकी दहा अशा एकूण २० फेरीवाल्यांसाठी जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र, सध्या या रस्त्यांवर एकही फेरीवाला बसत नाही. तसंच या परिसरात शाळा असल्यानं हॉकर्स झोन तयार करण्याचा नियमावलीचं उल्लंघन करण्यात आल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

मुंबई महापालिकेनं मुद्दाम राज ठाकरे यांच्या घराबाहेर फेरीवाल्यांना जागा दिल्याचा आरोपही मनसेनं केला आहे. एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसेनं फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर काँग्रेस आणि मनसेत राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर आता न्यायालयाच्या निर्णयानुसार हॉकर्स झोन तयार करण्यात आले आहेत.

दरम्यान, महापालिकेनं हॉकर्स झोनमधील रस्त्यांची यादी यापूर्वीच जाहीर केली आहे. येत्या ३१ जानेवारीपर्यंत त्यावर सूचना आणि हरकती मागवण्यात येणार आहे. त्यावर विचार होऊन मगच अंतिम यादी तयार करण्यात येईल.

संबंधित बातम्या :

मनसेला ‘हॉकर्स भूषण’ पुरस्कार द्या : रामदास आठवले

राज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं : नाना

भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांना का हटवता? : नाना पाटेकर

नाना पाटेकरांनी माहिती नसताना उगाच चोंबडेपणा करु नये : राज ठाकरे

मनसेच्या गुंडांनी पुन्हा मार खाल्ला : संजय निरुपम