मुंबई : धुळे जिल्ह्यातील एका व्यक्तीने ब्लेडने स्वत:'चा गळा कापत रविवारी संध्याकाळी आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्या करताना या व्यक्तीने फेसबुक लाईव्ह देखील केले. आयर्लंड येथील फेसबुक मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी याविषयी मुंबई पोलिसांना माहिती दिली. मुंबई पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता लोकेशन शोधत धुळे पोलिसांच्या मदतीने तरुणाचे प्राण वाचवले.
ज्ञानेश्वर पाटील (23 वर्षे) असे या तरुणाचे नाव आहे. ज्ञानेश्वरची आई होम गार्ड असून धुळे पोलिसांसाठी काम करते. सायबर सेलच्या डीसीपी डॉ. रश्मी करंदीकर म्हणाल्या, रात्री 8 वाजून 10 मिनीटानी आयर्लंडच्या मुख्यालयातून फेसबुक प्रतिनीधीचा फोन आला. ज्ञानेश्वर पाटील नावाच्या युवकाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या तरुणाची लवकरात लवकर मदत करा आणि त्याचे प्राण वाचवा असे सांगितले. त्यानंतर लगेच ज्ञानेश्वर पाटीलचा शोध टीमने घेतला. 8 वाजून 30 मिनीटांनी टीमला ज्ञानेश्वरचा घरचा पत्ता मिळाला. त्यानंतर सायबर पोलिसांनी नाशिक रेंदचे आयजी प्रताप दीघावकर आणि धुळ्याचे एसपी चिन्मय पंडित यांनी या विषयी माहिती दिली. साधारण 9 वाजता लोकल पोलिस ज्ञानेश्वरच्या घरी पोहोचले. त्यांनी ज्ञानेश्वरला रुग्णालयात दाखल केले आणि त्याचे प्राण वाचवले
सायबर पोलिसांनी आतापर्यंत वाचवले 4 लोकांचे प्राण
ऑगस्ट महिन्यात एका शेफने फाशी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आत्महत्या करताना त्याने फेसबुक लाईव्ह केले. त्यावेळी फेसबुकने मुंबई पोलिसांना या विषयी माहिती दिली. चार तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांना त्याचे लोकेशन मिळाले. त्यांनंतर लोकल पोलिसांनी मीरारोड येथे राहणाऱ्या या शेफचे प्राण वाचवले. २७ वर्षीय शेफने आर्थिक चणचणीतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिसांना सांगितले.
एका 20 वर्षीय तरुणीचे मॉर्फ केलेले काही फोटो पॉर्न वेबसाइटवर टाकण्यात आले. या तरुणीला जेव्हा याविषयी कळाले तेव्हा तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. तरुणीच्या जवळच्या नातेवाईकांनी या बद्दल मुंबई पोलिसांना माहिती दिली. मुंबई पोलिसांनी तरुणीला समजावले आणि आत्महत्या करण्यापासून रोखले. काही तासातच वेबसाईटवरुन तरुणीचे फोटे काढले.
सांताक्रुझ येथील एका २१ वर्षीय तरुणीने मानसिक तणावातून आत्महत्येचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तीने तीचा मोबाईल कॉल गर्ल म्हणून टाकला होता. त्यानंतर त्या तरुणीला फोन येत होते. या कारणाने तरुणीने हाताची नस कापत आत्महत्येचा प्रयत्न केला. या सर्व प्रकाराची माहिती कुटुंबाने सायबर सेलला दिली. 24 तासाच्या आत सायबर पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि सर्व सोशल मीडियावरून तरुणीचा नंबर काढला. तेव्हा तरुणीने आत्महत्येचा विचार आपल्या डोक्यातून काढला.
कुर्ला परिसरात राहणाऱ्या एका 25 वर्षीय तरूणीने कौटुंबिक तणावातून आत्महत्या करण्याचा विचार असल्याची माहिती ट्वीट करत दिली. तरुणीच्या घरच्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुंबई पोलिसांकडे मदत मागितली. तरुणी कुठे राहते या विषयी घरच्यांना माहिती नव्हती म्हणून पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी दोन तासात तरुणीचा शोध घेतला. सायबर सेलने नेहरूनगर लोकल पोलिसांना या विषयी माहिती दिली. त्यानंतर पोलिस घरी गेले व तरुणीचे प्राण वाचवले.
करंदीकर म्हणाल्या, कोणत्याही समस्येचा उपाय आत्महत्या नाही. जर तुमच्या घरात कोणी आत्महत्येचा विचार करत असेल तर त्यांना डॉक्टरांच्या उपचाराची गरज आहे. त्यांच्याशी प्रेमाने वागले पाहिजे. आत्महत्या करण्यापासून रोखले पाहिजे.