BMC Covid Dead Body Bag Scam : मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. किशोरी पेडणेकरांवर कोवीड काळात बॉडीबॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. 


या आधी किशोरी पेडणेकरांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता, पण सत्र न्यायालयाने तो फेटाळला होता. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला पेडणेकरांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. न्यायमूर्ती नितीन जमादार यांनी ही याचिका निकाली काढताना किशोरी पेडणेकरांना तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.


कोरोना काळात मुंबई महापालिकेत बॉडी बॅग घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाची ईडीने चौकशी सुरू केली. किशोरी पेडणेकरांनाही ईडीने चौकशीसाठी बोलवले होते. 


ईडीच्या चौकशीनंतर किशोरी पेडणेकरांवर अटकेची टांगती तलवार होती. लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांवर एकामागून एक अशा कारवाया केल्या जात आहेत. अशात आता किशोरी पेडणेकरांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


काय आहेत नेमके आरोप?


मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या काळात, कोरोना काळात बॉडी बॅग घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. किशोरी पेडणेकर महापौर असताना 16 मे ते 7 जून 2020 या कालावधीत 1200 बॉडी बॅग खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यासाठी प्रत्येक बॅगमागे 6,719 रुपये मोजण्यात आले होते आणि त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. 


याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं किशोरी पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. किशोरी पेडणेकर महापौर असताना त्यांच्या आदेशानंच पालिका अधिकाऱ्यांनी या बॉडी बॅगची खरेदी केल्याचा उल्लेख आर्थिक गुन्हे शाखेच्या एफआयआरमध्ये आहे.


मूळ किमतीपेक्षा वाढीव भावानं ही खरेदी केल्यानं या व्यवहारातील टक्केवारी आरोपींना मिळाल्याचा संशय व्यक्त केला गेला असून त्या अनुषंगानं पोलिसांचा तपास सुरू आहे. याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्यासह वेदांत इनोटेकचे (व्हीआयपीएल) संचालक आणि कंत्राटदार तसेच वरिष्ठ अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) यांच्यासह पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आरोपी बनवण्यात आलं आहे.


ही बातमी वाचा: