मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दक्षिण मुंबईची जागा (South Mumbai Lok Sabha Election) कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच असा निश्चय केलेल्या भाजपने आता साम दाम दंड भेद नीती आखायला सुरूवात केल्याचं दिसतंय. या आधी कुख्यात गुंड अरूण गवळीची (Arun Gawli) तुरुंगातून कायमची सुटका होणार अशी बातमी येत असताना आणखी एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अरूण गवळीच्या कन्या गीता गवळी (Geeta Gawli) यांना मुंबईच्या महापौर करेपर्यंत आपण साथ देऊ असं वक्तव्य विधानसभा अध्यक्ष आणि दक्षिण मुंबईतून इच्छुक उमेदवार राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar) केलं आहे. त्यामुळे अरूण गवळीच्या मुलीला आता भाजप महापौर करणार अशी चर्चाही सुरू झालीय.


दक्षिण मुंबईमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी प्रचार सुरू केला असून 14 एप्रिल रोजी त्यांनी भायखळ्यातील हेरिटेज हॉटेलमध्ये सभा घेतली होती. अरूण गवळीच्या आखिल भारतीय सेनेच्या कार्यकर्त्यांचा तो मेळावा होता. त्यासाठी गवळीच्या कन्या नगरसेविका गीता गवळी उपस्थित होत्या.  त्याचा आता एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


काय म्हणाले राहुल नार्वेकर? (Rahul Narwekar Video On Arun Gawli) 


अरूण गवळीचा पक्ष असलेल्या आखिल भारतीय सेनेच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल नार्वेकर म्हणाले की, गेल्या 20 वर्षांपासू मी न्यायालयात वकिली करतोय. विधानसभा अध्यक्ष म्हणून काम केलंय, यापुढेही तुमच्या आशीर्वादाने जबाबदारी मिळत राहिल. आखिल भारतीय सेनेची साथ मी कधीही सोडणार नाही. या कार्यकर्त्यांना जे प्रेम गीता गवळी आणि अरूण गवळींकडून मिळालंय, तेच प्रेम माझ्याकडून मिळणार. आखिल भारतीय सेनेच्या परिवारामध्ये आज एक नवीन सदस्य जोडला गेला आहे. आमच्या बहिणीला या भावाची साथ फक्त लोकसभेपुरती नाही तर मुंबईची महापौर होईपर्यंत आम्ही देत राहू. 


गीता गवळींना भाजप महापौर करणार? 


या आधी दक्षिण मुंबईमध्ये राजकीय फायदा व्हावा यासाठी कुख्यात गुंड अरूण गवळीची सुटका करण्याचा निर्णय महायुतीने घेतल्याची जोरदार चर्चा आहे. त्यानंतर आता अरूण गवळीच्या मुलीला, म्हणजे नगरसेविका गीता गवळी यांना मुंबईच्या महापौर करण्याचं आश्वासन दिलं आहे. दक्षिण मुंबईतून महायुतीचे इच्छुक उमेदवार राहुल नार्वेकरांनी तसं जाहीर आश्वासन दिलं आहे. 


शिवसेना ठाकरे गट आणि भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या दक्षिण मुंबईच्या जागेवर ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांच्या नावाची घोषणा झाली आहे. पण भाजपकडून अद्याप कुणालाही उमेदवारी जाहीर झालेली नाही. ही जागा या आधी शिवसेना शिंदे गटाकडे होती. पण नुकतेच शिंदे गटात प्रवेश केलेल्या मिलिंद देवरा यांना महायुतीने राज्यसभेवर पाठवल्यानंतर भाजपने या जागेवर दावा केल्याची माहिती आहे.


गवळीच्या मतांवर भाजपचा डोळा? 


शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर  यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात गुंड अरूण गवळीला 2007 मध्ये अटक करण्यात आली होती. या प्रकरणात अरूण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. दक्षिण मुंबईमधील लालबाग, परळ, भायखळा, करीरोड, दगडी चाळ, सातरस्ता, माजगाव या भागात अरूण गवळीला मानणाला मोठा वर्ग आहे. हा वर्ग आपल्याकडे वळवण्यासाठी महायुती सरकारने अरूण गवळीच्या सुटकेचा आदेश काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 


सन 2004 साली दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरुण गवळीने शिवसेनेच्या मोहन रावले यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती. तर त्यावेळचे राष्ट्रवादीचे नेते आणि अरूण गवळीचे भाचे सचिन अहिरही त्यावेळी निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यावेळी अरूण गवळीला 92 हजार मते मिळाली होती.


त्यावेळी सचिन अहिर आणि अरुण गवळी यांना मिळालेल्या मतांचा आकडा हा निवडून आलेल्या सेनेच्या मोहन रावले यांच्या मतांच्या आकड्यापेक्षा जास्त होता.  नेमकी हीच बाब लक्षात घेत महायुतीने गवळींच्या सुटकेचं जाळ टाकल्याची चर्चा आहे.


ही बातमी वाचा: 



Rahul Narwekar On Geeta Gawali : गीता गवळी मुंबईच्या महापौर होईपर्यंत साथ सोडणार नाही-राहुल नार्वेकर