मुंबई : लग्नाला नकार दिल्याने तरुणाने 21 वर्षीय तरुणीला रेल्वेसमोर ढकलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईत खार स्टेशनवर ही घटना घडली. अचानक झालेल्या अपघातात मुलगी चमत्कारिकरित्या बचावली आहे. परंतु तिला गंभीर दुखापत झाली आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने रेल्वे पोलिसांनी आरोपीला अवघ्य 12 तासांच्या आत बेड्या ठोकल्या.


सुमेध जाधव असं आरोपीचे नाव असून तो मुंबईच्या वडाळा भागात राहतो. तर तरुणी खार भागातील रहिवासी आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय चौधरी यांनी एबीपी न्यूजला माहिती दिली की, पीडित तरुणी आणि आरोपी गेल्या 2 वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत. दोघेही एकाच ठिकाणी काम करायचे. तिथेच सुमेधला तरुणीवर प्रेम झालं आणि त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. मात्र सुमेधला दारूचं व्यसन होतं, ज्या कारणाने तरुणीने सुमेधला लग्नास नकार दिला. मात्र त्यानंतरही सुमेधने तरुणीचा पाठलाग सोडला नाही.


तरुणीची यापूर्वीच पोलिसात तक्रार दाखल


सुमितच्या त्रासाला कंटाळून तरुणीच्या घरच्यांनी निर्मलनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही केली होती. ज्यानंतर काही दिवस सुमेध शांत होता. मात्र पुन्हा त्याने तरुणीला त्रास देण्यास सुरुवात केली. शुक्रवारी तरुणी जेव्हा खार स्टेशनवर आली तेव्हा सुमेध जाधवने तिला पुन्हा लग्नासाठी विचारणा केली. मात्र तरुणीने पुन्हा नकार दिला. त्यानंतर सुमेध जाधवने स्वतःला जीवे मारण्याची धमकी दिली. प्रथम त्याने चालत्या ट्रेनसमोर धाव घेतली पण नंतर तरुणीकडे परत गेला. त्यानंतर सुमेधाने तरुणीला चालत्या ट्रेन खाली ढकलण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तरुणी बचावली. मात्र तिच्या डोक्यावर बारा टाके पडले आहेत. घटनेनंतर सुमेध तिथून पळून गेला. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आणि अखेर सुमेध जाधवला बेड्या ठोकल्या.