मुंबई : इयत्ता दहावी बोर्डाचा अभ्यासक्रम हा 50 टक्के कमी करा! अशी मागणी मुंबईतील मुख्यध्यापक आणि शिक्षक संघटनांनी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षण दिले जात असताना याआधी दहावीचा अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्यात आला होता. मात्र, असं करूनही राज्यातील असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना अजूनही पूर्णपणे ऑनलाइन शिक्षण मिळू शकलेले नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यावर पूर्ण करता यावा. सोबतच या ऑनलाइन शिक्षण पूर्णपणे मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांची परिक्षेपूर्वी तयारी करून घेता यावी, यासाठी पुरेसा वेळ मिळावा त्यामुळे ही मागणी करण्यात आली आहे.
इयत्ता दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा ह्या मे-जून महिन्यात होणार असल्याचं शिक्षण मंत्र्यांनी यापूर्वी जाहीर केलं. पण तोपर्यंत ज्या तळागाळातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण पूर्णपणे मिळालं नाही त्याबाबत नेमका विचार शिक्षण विभागाने केला का? हा प्रश्न मुंबई मुख्याध्यापक संघटनासह राज्यातील इतर शिक्षक संघटना व ग्रामीण भागातील शिक्षक विचारताय. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यावर या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांची बोर्डाच्या परिक्षेसाठी तयारी मे पर्यंत करून घेता यावी, यासाठी यावर्षी दहावीचा अभ्यासक्रम 25 टक्के नाही तर 50 टक्के कमी करा, असं शिक्षकांचं म्हणणं आहे.
एकीकडे, मुंबई, ठाण्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा जानेवारी उजाडला तरी सुरू झाल्या नाहीत. त्या या महिन्यात सुरू होतील. तरी देखील पुढील तीन महिन्यात ऑनलाइन शिक्षण न मिळलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांची तयारी करणं अशक्य असल्याच, मुंबई मुख्यध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी सांगितलं. तर दुसरीकडे एकतर या सगळ्यांचा विचार करता 50 टक्के अभ्यासक्रम कमी करा, नाहीतर 50 टक्के गुण हे अंतर्गत देण्याबाबत विचार करावा अशी मागणी महाराष्ट्र शिक्षक परिषद संघटनेच्यावतीने शिवनाथ दराडे यांनी केलीये.
मुंबईतील शिक्षकांचा म्हणणं आहे तेच म्हणणं ग्रामीण भागात शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचंसुद्धा आहे. ऑनलाइन शिक्षण हा शिकवण्यासाठीचा तात्पुरता पर्याय होता. त्यामुळे ग्रामीण भागातील अगदी तळागाळातील विद्यार्थ्यांना दहावी बोर्डाच्या तयारीला पुरेसा वेळ द्यावा, जेणेकरून त्यांना सुद्धा इतर विद्यार्थ्यांप्रमाणे ज्यांना ऑनलाइन शिक्षण मिळाले त्याप्रमाणे समान न्याय परीक्षा देताना मिळेल, असं ग्रामीण भागातील शिक्षकांचं म्हणणं आहे. जानेवारीपासून शाळा सुरू होत असतील तर किमान सहा महिने प्रत्यक्ष शाळेत विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतरच परिक्षा घेतल्या जाव्यात. तयारी नसताना व अभ्यासक्रम पूर्ण नसताना परीक्षा घेण्याचा आटापिटा शिक्षण विभागाने करू नये, अशी भूमिका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकविणारे प्रयोगशील शिक्षक भाऊसाहेब चासकर यांनी मांडली आहे. त्यामुळे शिक्षण विभाग या सगळ्यांच्या मागण्यांचा विचार करून काय पर्याय समोर आणतो हे पहावं लागणार आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI