मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने सिटी को ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध घातले आहेत. यानुसार खातेदारांना सहा महिन्यात फक्त 1 हजार रुपयेच काढता येणार आहेत.


या निर्णयांनंतर रात्री उशिरा सिटी को ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांनी मुंबईतील गिरगाव शाखेसमोर पैसे मिळावेत म्हणून गोंधळ घातला. रिझर्व्ह बँकेने 17 एप्रिलला सिटी बँकेला पत्र पाठवून ठेवी घेण्यास आणि कर्ज देण्यास मनाई केली आहे.

या सिटी को ऑपरेटिव्ह बँकेच्या कोणत्याही व्यवहारासाठी आता रिझर्व्ह बँकेची लेखी परवानगी आवश्यकता असेल.

आरबीआयची नोटीस

सिटी को ऑपरेटिव्ह बँकेच्या एकूण 10 शाखा आहेत. या बँकेला डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेकडून एक नोटीस पाठविण्यात आली. त्यानंतर 17 एप्रिलला या बँकेच्या सर्व बचत/सेव्हिं आणि चालू/करंट अकाऊंट सील करून बँकेच्या व्यवहारावर निर्बंध घातले गेले. त्यामुळे आपले लाखो रुपये अडकल्याने लोकांनी बँकेबाहेर गर्दी केली. आम्हाला आमचे पैसे परत हवे, अशी मागणी खातेदारांनी केली. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधामुळे हे शक्य नसल्याचं बँकेकडून सांगण्यात आलं.

शिवसेना खासदार अध्यक्ष

या बँकेच्या अध्यक्ष पदावर शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ हे आहेत.

“बँक

ेला पत्र येण्याआधीच आम्ही या बँकेचं दुसऱ्या बँकेत विलिनीकरणाचे प्रयत्न सुरु केले होते. काम पूर्ण झालं असून, काही दिवसात हे विलिनीकरण पूर्ण होईल. शिवाय कोणत्याही ग्राहकाने चिंता करु नये, कोणाचाही पैसा बुडणार नाही. प्रत्येकाचे पैसे या बँकेत सुरक्षित असून, बँकेवर 75 वर्ष जसा विश्वास ठेवला तसाच कायम असू द्या” असं आवाहन खासदार अडसूळ यांनी केलं.

यासोबतच 2014-15, 2015-16 याकाळात महाव्यवस्थापक/ जनरल मॅनेजर रमेश शिरगावकर यांनी बेमालूमपणे काही अधिकाऱ्यांसोबत घेऊन अनेक व्यवहार केले. याची माहिती उशिरा कळल्याने आम्हाला या परिस्थीला तोंड द्यावे लागत असल्याचं अडसूळ यांनी सांगितलं.

सिटी को ऑपरेटिव्ह बँकेचं भांडवल

  • सिटी को ऑपरेटिव्ह बँकेच्या एकूण शाखा 10 आहेत

  • बँकेचे एकूण ठेवीदार - 91000

  • 13 हजार ठेवीदारांचे बँकेत 1 लाखांपेक्षा जास्त पैसे आहेत.

  • तर 18000 ठेवीदारांचे 1 हजारापर्यंत पैसे बँकेत आहेत.


विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, त्यासोबतच लग्न समारंभ यासाठी लागणारी 50 हजारापर्यंत रक्कम बँकेकडून रिजर्व्ह बँकेच्या परवानगीने मिळणार आहेत.

बँकेवर निर्बंध जरी लागले तरी ठेवीदारांनी बँकेवर विश्वस ठेवावा. त्यांचे पैसे सुरक्षित असून बँकेचं विलिनीकरण झाल्यानंतर हा तिढा सुटेल, असा विश्वास बँकेने व्यक्त केला आहे.