वांगणी : एबीपी माझाने दोन दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील वांगणी गावातील दिव्यांग बांधवांच्या व्यथा दाखवल्या होत्या. त्यानंतर आज भाजप आमदार राम कदम यांनी या बातमीची दखल घेत स्वतः वांगणी गावात जाऊन सर्व दिव्यांग बांधवांना महिनाभर पुरेल इतके धान्याचे किट आणि एक वेळचं जेवणं दिलं. तर कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनने आठ महिन्यांच्या गर्भवती असणाऱ्या दोन्ही महिलांची जबाबदारी घेतली. सोबतच 350 अंध बांधवांच्या कुटुंबियांना धान्याचे किट आणि सर्व बांधवांची मेडिकल तपासणी केली. यावेळी सर्वांना मोफत सॅनिटायझर, मास्क, भूक लागण्यासाठी टॉनिक देण्यात आलं. तसेच प्रत्येकाचे शारीरिक तापमान, ऑक्सिजन लेव्हल, साथीच्या आजारांची तपासणी आणि उपचार करण्यात आले.


दिव्यांग बांधवांना मदत केल्यानंतर ' एबीपी माझा' शी बोलताना आमदार राम कदम यांनी दिव्यांग बांधवांच्या अडचणींना वाचा फोडल्यामुळे एबीपी माझाचं विशेष कौतुक केलं. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लवकरच पत्र लिहून अंध बांधवांसाठी या कठीण काळात ठोस उपाय योजना करण्यासाठी मागणी करणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच भविष्यात काही अडचण आल्यास त्यांना मदतीसाठी सदैव तत्पर असू, असं देखील त्यांनी म्हटलं.


दिव्यांग बांधवांसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने दिवसभर मेडिकल कँप राबवण्यात आला. तसेच यावेळी एबीपी माझाने ज्या दोन गर्भवती महिलांची व्यथा समोर आणली होती, त्या दोन महिलांची प्रसूती पूर्व आणि प्रसूती नंतरची संपूर्ण जबाबदारी घेत असल्याचं फाउंडेशनच्या वतीने जाहीर करण्यात आलं. तसेच त्यांना आर्थिक मदत देखील करण्यात आली.


'बायको आठ महिन्यांची पोटुशी, चार दिवस झालं गॅस संपलाय' वांगणीतील अंधबांधवांची व्यथा


यासोबतचं ऐरोली येथे राहणारे हॉटेल व्यावसायिक राहुल नाईक यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाचा खर्च टाळून 50 अंध बांधवांना स्वतः उपस्थित राहून आर्थिक मदत केली. याबाबत बोलताना राहुल नाईक म्हणाले की, सध्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकजण आर्थिक संकटात आहेत. अशा परिस्थितीत अंध बांधवांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. ही बाब एबीपी माझाने समोर आणल्यानंतर मी यंदा माझा मुलगा सौरिष नाईक याच्या वाढदिवसासाठी येणारा संपूर्ण खर्च दिव्यांग बांधवांसाठी देण्याचे ठरवले. याला माझ्या पत्नीचा देखील दुजोरा मिळाला. यानंतर आम्ही आमच्या मुलाच्या हस्ते अंध बांधवांना मदत करत आगळावेगळा वाढदिवस साजरा केला. सध्या या बांधवांना आर्थिक रक्कमेची गरज आहे. यानिमित्ताने आम्ही नागरिकांना आवाहन करतो की या बांधवांना जास्तीत जास्त मदत करा.


एबीपी माझाच्या बातमीनंतर सध्या वांगणी येथील दिव्यांग बांधवांसाठी मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब शिंदे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, आमच्या बांधवांचे लॉकडाऊनच्या काळात प्रचंड प्रमाणात हाल झाले. गावच्या सरपंचांच्या माध्यमांतून आम्हाला एक वेळ जेवणं सुरू होतं. परंतु गावामध्ये संशयित रुग्ण आढळल्यानंतर मदत बंद करण्यात आली. एकीकडे कमवण्याचे साधन बंद असल्यामुळे पोटाचे हाल तर दुसरीकडे घरातून बाहेर पडलो तर कोरोना व्हायरस होण्याची भिती होती. परंतु एबीपी माझाने आमच्या बांधवांची व्यथा दाखवली. त्यामुळे आम्हाला मोठा फायदा झाला. बांधवांना महिना दोन महिने पुरेल इतकं रेशनिंग मिळालं आहे.