मुंबई : राज्यभरात काल (30 ऑगस्ट) रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan 2023) सण पार पडला. सामान्यांपासून राजकारणातील भावंडांनी मोठ्या उत्साहात राखीपौर्णिमेचा सण साजरा केला. परंतु सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवार (Ajit Pawar) या महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख भावंडांनी मात्र यंदा राखीपौर्णिमा साजरा केली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी दिवसभरात रक्षाबंधनासाठी सिल्वर ओक (Silver Oak) या शरद पवारांच्या निवासस्थानी गेलेच नाहीत. मात्र अजितदादा आज रक्षाबंधन साजरी करण्यासाठी येतील अशी आशा सुप्रिया सुळे यांना आहे.


अजित पवार संध्याकाळी सातपर्यंत अज्ञातस्थळी


प्रत्येक वर्षी पवार कुटुंबियांचा रक्षाबंधन सोहळा सिल्वर ओक निवासस्थानी पार पडतो. एरव्ही दुपारपर्यंत पवार कुटुंबाचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडतो. परंतु काल दिवसभरात अजित पवार सिल्वर ओकवर गेले नाहीत. पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा हा पहिलाच रक्षाबंधनाचा सण होता. अजित पवार काल संध्याकाळी सात वाजेपर्यंत अज्ञातस्थळी असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. त्यानंतर साडेसात वाजता अजित पवार यांनी पक्षाच्या कोर कमिटीची प्रफुल्ल पटेल यांच्या वरळी येथील कार्यालयात बैठक घेतली. 


श्रीनिवास पवार सिल्वर ओकवर पण अजित पवारांनी जाणं टाळलं 


विशेष म्हणजे अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी सिल्वर ओकवर जाऊन सुप्रिया सुळे यांच्यासोबत राखीपौर्णिमा साजरी केली. परंतु अजित पवार यांनी मात्र सिल्वर ओक निवासस्थानी जाणं टाळलं. त्यामुळे आज तरी अजित पवार रक्षाबंधन सोहळ्यासाठी सिल्वर ओकवर जाणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.






हेही वाचा


पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं तब्बल 13 वर्षांनी एकत्रित रक्षाबंधन