Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीबाबत आज दुपारी तीन वाजता चित्र स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी सहा जागा आहेत. या सहा जागांसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या राजकीय घडामोडींवर आज सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 


राज्यात राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात लढत होणार का हे आज स्पष्ट होणार आहे. विधानसभेतील आमदार या निवडणुकीसाठी मतदान करतात. सध्या असलेल्या विधानसभा आमदारांच्या संख्याबळानुसार, भाजपचे दोन उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. तर, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस  आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक उमेदवार सहज विजयी होऊ शकतो. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले अतिरिक्त मते आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांच्या बळावर शिवसेना सहावी जागा जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. तर, भाजपलादेखील सहावी जागा जिंकण्यासाठी 13 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे ही निवडणूक झाल्यास ती अटीतटींची होणार असल्याचे म्हटले जात आहे. 


विधानपरिषदेच्या बदल्यात राज्यसभा निवडणूक बिनविरोध?


राज्यसभेच्या सहा आणि विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यसभेसाठी भाजपनं तीन उमेदवार मैदानात उतरवले आहेत. तर, महाविकास आघाडीनं चार उमेदवार दिले आहेत. पण आता राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार का? याची चर्चा सुरू झाली. राज्यसभेसाठी शिवसेनेनं आपला एक उमेदवार मागे घेतला तर भाजप विधान परिषदेसाठी फक्त चारच उमेदवार देईल. त्यामुळे विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करायची असेल तर शिवसेनेलाला एक पाऊल मागे जाऊन राज्यसभा निवडणूक बिनविरोध करावी लागेल. तसं झालं तर विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीला 10 पैकी 6 जागा मिळतील आणि भाजपला 4 जागा मिळतील, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Rajya Sabha Election : ज्याला पहिल्या पसंतीची सर्वाधिक मतं, तो ठरवणार निकाल? राज्यसभा निवडणुकीत कुणाची रणनीती विजयी ठरणार?