मुंबई: महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने (Maharashtra ATS) देशातील लष्कर-ए-तैयबा ऑपरेटिव्हविरुद्ध केलेल्या मोठ्या कारवाईत जम्मू-काश्मीरमधील एका 30 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आफताब हुसैन शाह हा पुण्यातून अटक करण्यात आलेल्या मोहम्मद जुनैदच्या तसेच परदेशातील लष्कर-ए-तैयबा ऑपरेटरच्या संपर्कात होता. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची नेमकी भूमिका काय, तो मोहम्मद जुनैदच्या संपर्कात का आणि कसा होता याचा सविस्तर तपास एटीएस करत आहे.
या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 121(A), 153(A), IPC r/w S. 66 नुसार दहशतवाद विरोधी पथक, काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक आरोपी जुनैद मोहम्मद याला प्रतिबंधित संघटना लष्कर-ए-तैयबा (LeT) साठी भर्ती एजंट म्हणून काम केल्याबद्दल पुण्यात अटक करण्यात आली होती.
जुनैद हा जम्मू-काश्मीरमधील काही लोकांच्या संपर्कात असल्याचे एटीएस अधिकाऱ्यांना तपासात आढळून आले. संबंधित माहिती गोळा करून भारतातील LET ऑपरेटिव्हची साखळी तोडण्यासाठी एटीएसची टीम जम्मू-काश्मीरला पोहोचली.
गेल्या काही दिवसांपासून एटीएस, महाराष्ट्राच्या तीन पथकांनी स्थानिक जिल्हा पोलिसांच्या समन्वयाने कारगिल, गांदरबल, श्रीनगर भागात विविध ठिकाणी शोध आणि चौकशी सुरू केली होती. बुधवारी संध्याकाळी एटीएस, महाराष्ट्राचे एक सुसज्ज पथक श्रीनगरपासून 211 किमी अंतरावर असलेल्या किश्तवाड येथे पोहोचले आणि त्यांनी आफताब हुसैन शाह, वय-30 वर्षे, याला अटक केली.
आरोपीला संबंधित अधिकार क्षेत्रातील सक्षम न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात देण्यात आले. महाराष्ट्रात आल्यावर त्याला पोलीस कोठडीसाठी सक्षम न्यायालयासमोर हजर केले जाईल.
आरोपी आफताब हुसैन शाहचा जन्म जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड येथे झाला. तो व्यवसायाने सुतार असून किश्तवाडमध्ये त्याच्याकडे जमीन आहे. जुनैद मोहम्मद आणि परदेशात राहणारा एलईटी ऑपरेटीव्ह यांच्यातील आफताब संपर्कात असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.