Corona Update : तब्बल दोन वर्ष थैमान घालणारा कोरोना विषाणू (Corona Virus) पुन्हा एकदा आपले हात पाय पसरू लागला आहे. कोरोना संसर्गाचा वेग मंदावल्याने निर्बंध काढून टाकण्यात आले होते. पुन्हा एकदा लोकांचे जीवन पूर्वपदावर येत होते. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढलं आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे सक्रिय रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी देखील या संदर्भात माहिती दिली आहे.
राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागलीय. सध्या राज्यात 1000च्या वर सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या प्रसाराचा वेग अधिक आहे. हा नवा व्हेरियंट ओमायक्रोनच्या वंशावळीतीलच असून, गंभीर स्वरुप धारण करणार नाही, असे डॉ. प्रदीप आवटे म्हणाले. मात्र, आधीच आजारी असलेल्या व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. चेहऱ्यावर मास घालणं, सोशल डिस्टंसिंग, हात स्वच्छ करणं गरजेचं आहे, असेही ते म्हणाले. संसर्गाचा वेग पाहता आवश्यक वाटल्यास निर्बंध येण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढतायत!
राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. गुरुवारी (2 जून) राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने हजाराचा टप्पा ओलांडला आहे. या दिवशी एकूण 1045 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 517 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनामुळे गुरुवारी एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे. गुरुवारी मुंबईत 704 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे.
राज्यात आज एकूण 4559 सक्रिय रुग्ण आढळले असून, मुंबईत सर्वाधिक म्हणजे 3324 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालेखाल ठाण्याचा क्रमांक असून, ठाण्यामध्ये 555 इतके सक्रिय रुग्ण आढळले आहेत. पुण्यातही 372 सक्रिय रुग्ण आहेत.
निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी!
गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल. निर्बंध नको असतील, तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी (2 जून) कोविड टास्क फोर्स समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी काही सूचना दिल्या.
संबंधित बातम्या