मुंबई: राज्यसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे प्रतिदावे सुरु झालेत. उद्या अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. पण निवडणूक अटळ ठरली तर महाविकास आघाडीची सरकार स्थापन झाल्यानंतरची ही पहिली परीक्षा ठरणार आहे. या निवडणुकीत मतगणनेची पद्धत पाहता रणनीतीही तितकीच सावधानतेनं करावी लागणार आहे. 


राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाराष्ट्रात रिंगणात उमेदवार आहेत सात. 3 जून ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे आणि जर कुणीच माघार घेतली नाही तर निवडणूक अटळ आहे. 


शिवसेना आणि भाजपमध्ये खरी लढत
पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी 42 मतं आवश्यक आहेत. प्रत्येक पक्षाची विधानसभेतली स्थिती लक्षात घेतली तर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, शिवसेनेचे संजय राऊत, भाजपचे पीयुष गोयल आणि अनिल बोंडे हे आरामात निवडून येऊ शकतात. पण खरी लढत होईल ती शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात.


राज्यसभेची मतगणना ज्या पद्धतीनं होते ती पाहता प्रत्येक पक्षाला बुद्धिबळातल्या पटाप्रमाणे चाल करावी लागणार आहे. विधानसभेत सध्या 287 आमदार आहेत. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे संख्याबळ एकने कमी झालंय. सर्व आमदारांनी आपल्या मताचा हक्क बजावला तर राज्यसभेसाठी आवश्यक मतांचा कोटा काय ठरतो हे पाहुयात,


पहिल्या पसंतीच्या एका मताची किंमत असते 100


निवडणुकीत एकूण वैध मतांची किंमत होते 287* 100= 28,7000
        
कोटा = वैध मतांची किंमत/एकूण जागा + 1 + 1
                     
   =    28700/ 6+1 +1  = 4101
                                   
म्हणजे पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी एका उमेदवाराला 4101 मतं मिळणं आवश्यक आहे. पण सध्याची स्थिती पाहिली तर केवळ पाच उमेदवारांना ती मिळू शकतात. उरलेल्या दोन उमेदवारांचा फैसला हा दुसऱ्या पसंतीच्या मतांवर होऊ शकतो. दुसऱ्या पसंतीची मतं मोजण्याची पद्धत आणि या प्रत्येक मताची किंमत काढण्याची पद्धत ही जरा वेगळी आहे.


म्हणजे महाविकास आघाडी काय किंवा भाजप काय, जर त्यांना हे लक्षात आलं की आपला शेवटचा उमेदवार हा पहिल्या पसंतीच्या मतांवर निवडून आणणं शक्य नाही तर त्यासाठी ते दुसऱ्या पसंतीच्या मतांची आखणी नीट करावी लागेल. ज्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची सर्वाधिक मतं, त्याची दुसऱ्या पसंतीची मतं सर्वात आधी मोजली जाणार आहेत. त्यामुळे ही पहिली पसंती कुणाला द्यायची, त्यांना 42 पेक्षा किती अधिक मतं द्यायची आणि त्या उमेदवाराच्या दुसऱ्या पसंतीची सर्व मतं शेवटच्या उमेदवाराला कशी ट्रान्सफर होतील याची काळजी करावी लागणार आहे. 


गंमत ही आहे की दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरु झाल्यानंतर जो सर्वात आधी आवश्यक मतांच्या कोट्याजवळ पोहचेल तो विजयी घोषित होतो. म्हणजे पुढच्या मतमोजणीची गरज पडत नाही. त्यामुळे सगळ्यात निर्णायक गोष्ट हीच ठरते की दुसऱ्या पसंतीची मतं पहिल्यांदा कुणाची मोजली जाणार आणि ज्या उमेदवाराच्या  पहिल्या पसंतीच्या मतांची संख्या अधिक त्याच्या दुस-या पसंतीच्या मतांची किंमत ही अधिक असते.


त्याचमुळे आता राज्यसभेसाठी ही आकड्यांची लढाई दोन्ही बाजूंना नीट खेळावी लागणार आहे. राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषदेच्याही निवडणुका होतायत. त्यामुळे सत्ताधारी विरोधकांमध्ये त्यातून काही साटंलोटं होऊन निवडणुका बिनविरोध होतात का हेही पाहावं लागेल. पण तसं न झाल्यास मात्र सगळं काही या अंकगणितावरच अवलंबून असणार आहे. जो या पटावरच्या चाली उत्तम खेळेल त्याचा विजय नक्की.