मुंबई : आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली.
भाजप शिवसेनेविरोधात एक आघाडी व्हावी याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राज ठाकरे यांनी अजूनही आघाडीत जायचं की स्वबळावर लढायचं याबाबत निर्णय घेतला नाही. यावर शेट्टी आणि ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.
शेट्टी यांची गेल्या काही दिवसातली राज ठाकरे यांची दुसरी भेट आहे. गेल्या मे महिन्यात त्यांनी ठाकरे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. वाढत्या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राज ठाकरे यांच्याबरोबर विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. सर्व भाजपविरोधी पक्षांचा पर्याय निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठीच राज ठाकरे यांची भेट घेतली. महाआघाडीत मनसेला घ्यायला काँग्रेसचासुद्धा विरोध मावळेल अशी आशा आहे, असे राजू शेट्टींनी बैठकीनंतर सांगितले.
यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजू शेट्टी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही दिवसातच राजू शेट्टी पुन्हा राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याने पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान कालच लोकसभा निवडणुकीत आघाडीसोबत असलेले राजू शेट्टी यांनी विधानसभेला स्वाभिमानी शेतकरी संघटना 49 जागा लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 49 जागांवर विधानसभा लढवण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तयारी असून भाजप-शिवसेना सोडून सर्व पर्याय आमच्यासाठी खुले असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले होतं.
राज ठाकरे यांना आघाडीत घेण्याबाबत कॉंग्रेसमध्ये मतभेद असल्याचे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नुकतेच सांगितले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस मात्र राज ठाकरेंना आघाडीत घेण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे.
राजू शेट्टी यांनी पुन्हा घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय चर्चांना उधाण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Jul 2019 03:22 PM (IST)
यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजू शेट्टी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही दिवसातच राजू शेट्टी पुन्हा राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याने पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -