Raj Thackeray On Rahul Gandhi: नेस्को सेंटरमधील सभेत आज मनसेप्रमुख राज ठाकरेंची तोफ चांगलीच धडाडली. आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने मनसेचं काम आणि आंदोलन लोकापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलंय. सोबतच राज ठाकरेंनी आज उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. एकनाथ शिंदेंनी रात्री कांडी फिरवल्यानंतर उद्धव ठाकरे घराबाहेर पडल्याचा टोला राज ठाकरेंनी लगावला. शिवाय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं शिवरायांविरोधातील विधान आणि राहुल गांधींच्या सावरकरांविरोधातील वक्तव्यावरून सुरू झालेल्या वादावर राज ठाकरेंनी चांगलंच सुनावलंय. गांधी-नेहरूंच्या बदनामीचं कारस्थान थांबवण्याचा सल्ला यावेळी राज ठाकरेंनी भाजपला दिला. तर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्त्व्यावरून राज ठाकरेंनी तीव्र संताप व्यक्त केला. 


राहुल गांधीसंदर्भात नेमकं काय म्हणाले राज ठाकरे


एकेरी भाषेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, त्या दिवशी महाराष्ट्रात म्हैसूर सँडल आला होता ना. तो राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचा. लायकी तरी आहे का? सावरकरांबद्दल बोलायची. त्यांनी काय हालअपेष्टा सहन केल्या हे माहिती तरी आहे का? आमची कृष्ण नीती आम्हाला काय सांगते. एखादी चांगली गोष्ट घडायची असते तेव्हा स्ट्रॅटेजी ठरवली जाते, असं राज ठाकरे म्हणाले. 


नेहरुंवर टीका करणाऱ्या भाजपलाही खडसावलं


काँग्रेसला जसं सांगणं आहे तसेच भाजपला आणि इतर पक्षांना सांगणे आहे हे बस करा. जे आयकॉन म्हणून बनले त्याची बदनामी करून काय होणार नाही. दोन्ही बाजूंनी आमच्या स्वातंत्र्यसैनिकांची बदनामी होतेय. मी एक पंडित जवाहरलाल नेहरूंचा फोटो पाहिला. सोशल मीडियावर तो फोटो फिरत होता. त्यांचं अफेयर आहे असं तिथं लिहिलं होतं.  कोण आहे ती बाई, कोण आहे ती मुलगी, जी गालाचे चुंबन घेत होती. ती नेहरूंची नात किंवा परिवारीतल मुलगी होती. कसला तरी एक फोटो काढायचा आणि सुरू करायचं. हे या बाजूने चालणार मग काँग्रेसवाले सावरकरांवर बोलणार. बसं झालं आता हे सर्व, असा सल्ला राज ठाकरेंनी दिला. तुम्ही या नेत्यांचा अपमान करून काय मिळवणार, असंही ते म्हणाले. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सल्ला देत टोलेबाजी


राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सल्ला देत टोलेबाजी केली. राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेर जात आहेत. नरेंद्र मोदी यांनी पहिली पाच वर्षे उत्तर प्रदेश बिहार आणि उत्तराखंडकडे लक्ष द्यावे. त्या राज्यांमधील लोकं घरदार सोडून दुसऱ्या राज्यात जातात, त्यावेळी दुसऱ्या राज्यांना त्याचा त्रास होतो. आज दोन प्रकल्प जातात याचे वाईट एका गोष्टीचे वाटतं. कुठल्याही राज्यात प्रोजेक्ट केले त्याचं वाईट नाही वाटतं. सर्व राज्यांची प्रगती झाली तर देश प्रगत होतो. नरेंद्र मोदीजी, तुम्ही गुजरात गुजरात करू नका, प्रत्येक राज्य तुमचं अपत्य आहे, त्या प्रत्येक राज्याकडे समान पद्धतीनं पाहणं गरजेचं आहे. ही आपली धारणा होती, आहे आणि राहिल, असं राज ठाकरे म्हणाले. 


ही बातमी देखील वाचा


'तुम्ही गुजरात गुजरात करू नका, प्रत्येक राज्य तुमचं अपत्य, समान पद्धतीनं पाहा'; राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टोलेबाजी