Mumbai: राज्यभरात गोवर (Measles) धोखा हा वाढताना दिसत आहे. भिवंडीपाठोपाठ आता ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्हा, वसई विरार महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका आणि नवी मुंबई महापालिका या क्षेत्रातही गोवरचा उद्रेक झाला आहे. राज्यात आतापर्यंत 658 गोवरचे रुग्ण सापडले असून, संशयित रुग्णांची संख्या 10 हजार 234 इतकी आहे. तर 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईलगत असलेल्या ठाणे शहरांमध्ये गोवरचे 44  रुग्ण आढळले असून 303 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे.


तीन वर्षातील संशयित रुग्णांची नोंद पुढील प्रमाणे आहे




    • 2019 : 1, 337

    • 2020 : 2, 150

    • 2021 : 3,668

    • 2020 आतापर्यंत : 10,234







गोवरची लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने रुग्णांची संख्या वाढू शकते या पार्श्वभूमीवर हे संक्रमण रोखण्यासाठी महापालिकांकडून विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत. गोवरचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाकडून लसीकरण वाढविण्यात येणार आहे. आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून शून्य ते पाच वर्षे वयापर्यंतच्या मुलांना गोवर प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे की, नाही याची माहिती घेण्यात येत आहे. तसेच ग्रामीण भागात आशा कार्यकर्त्या अंगणवाडी कर्मचारी तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. संशयित रुग्ण आढळल्यास तात्काळ त्या रुग्णाचे रक्त तपासणीसाठी पाठवले जात असून याचा अहवाल शासनाला पाठवला जाणार आहे.


मुंबईत एकूण संशयित रुग्णाची संख्या 3831 इतकी आहे. यातील एकूण बाधित रुग्णाची संख्या 260 असून 10 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मुंबईमधील 10 वॉर्ड हे गोवर प्रभावित आहेत. दरम्यान, देशभरात बिहार, गुजरात, हरियाणा, झारखंड, केरळ आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये गोवरचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर दिनांक 23 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय स्तरावर या विषयातील तज्ञांची बैठक झाली. उद्रेक प्रतिसाद लसीकरण अंतर्गत ज्या भागांमध्ये गोवर उद्रेकजन्य परिस्थिती आहे त्या भागामध्ये नियमित लसीकरणाच्या नेहमीच्या डोस व्यतिरिक्त नऊ महिने ते पाच वर्षे या वयोगटातील मुलांना गोवर आणि रूबेला लसीची एक अधिकची मात्रा देण्यात यावी, अशी सूचना देण्यात आल्या आहेत.