Raj Thackeray Mumbai Rallyमनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे यांनी आज  गोरेगावमधील नेस्को सभागृहात कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यासह उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. सोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सल्ला देत टोलेबाजी केली. राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेर जात आहेत. नरेंद्र मोदी यांनी पहिली पाच वर्षे उत्तर प्रदेश बिहार आणि उत्तराखंडकडे लक्ष द्यावे. त्या राज्यांमधील लोकं घरदार सोडून दुसऱ्या राज्यात जातात, त्यावेळी दुसऱ्या राज्यांना त्याचा त्रास होतो. आज दोन प्रकल्प जातात याचे वाईट एका गोष्टीचे वाटतं. कुठल्याही राज्यात प्रोजेक्ट केले त्याचं वाईट नाही वाटतं. सर्व राज्यांची प्रगती झाली तर देश प्रगत होतो. नरेंद्र मोदीजी, तुम्ही गुजरात गुजरात करू नका, प्रत्येक राज्य तुमचं अपत्य आहे, त्या प्रत्येक राज्याकडे समान पद्धतीनं पाहणं गरजेचं आहे. ही आपली धारणा होती, आहे आणि राहिल, असं राज ठाकरे म्हणाले. 


राज ठाकरे म्हणाले की, राज्यपाल पदावर बसला म्हणून मान राखतो, नाहीतर राज्यात शिव्यांची कमतरता नाही. कोश्यारीजी आधी त्या गुजराती आणि मारवाडीला विचारा तुम्ही महाराष्ट्रात का आला? महाराष्ट्रसारखी सुपीक जमीन उद्योगासाठी मिळाली म्हणून ते आलेत महाराष्ट्र नेहमी मोठा आहे. 


आपली लायकी काय आपण काय बोलतो? अब्दुल सत्तारांवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल (Raj Thackeray on Abdul Sattar)


अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की,  हल्ली कोणी काय येतंय काही बरळतंय. राजकीय पक्षाचे जे काही प्रवक्ते बोलत असतात अरे कोणती भाषा. मी असा महाराष्ट्र बघितला नाही. एक मंत्री एका महिलेला भिकारचोट म्हणतो. काय भाषा असते काय बोलत असतात. त्यांना वाटतं विनोद करतो. तू कोण आहेस, आपली लायकी काय आपण काय बोलतो. मला भीती वाटते, आताचे तरुण हे पाहत असतील आणि ते म्हणत असतील असे असते का राजकारण? मग ठीक आहे, जातीपातीचे विष कालवण्यासाठी हे सुरू आहे का? असा सवाल राज ठाकरेंनी केला. 


उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीकास्त्र


उद्धव ठाकरेंवर टीका करताना राज ठाकरे म्हणलाे की, कालपरवापर्यंत मुख्यमंत्रीपदावर असलेले आणि आता बाहेर पडलेले तब्येतीचं कारण सांगून घरात बसले. एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या रात्री कांडी फिरवली अन् आता हे सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखं वागणारा मी नाही.  स्वत:च्या स्वार्थासाठी दिसेल तो हात हातात घेणारा मी नाही. मी यांच्यासारखा नाही. उद्धव ठाकरेंच्या अंगावर एकतरी केस आहे का? कधी भूमिका घेतलीच नाही. पैशासाठी, स्वार्थासाठी कधी हा कधी तो, मला सत्तेत बसवा अशी भूमिका घेतली. फक्त पैशासाठी आणि सत्तेसाठी याच्यासोबत त्याच्यासोबत गेले. बाळासाहेब जी भूमिका बोलत होते भोंगे उतरले पाहिजे ती इच्छा आपण पूर्ण केली. आपण भोंगे काढा असे नाही म्हणालो, नाही काढले, तर हनुमान चालीसा लावू असे सांगितले.  पण अजून काही ठिकाणी चरबी जिरलेली नाही.  जिथे जिथे हे सुरु असेल तर पोलिसांना तक्रार दाखल करा. तरी झालं नाही तर मोठ्या ट्रकमध्ये स्पीकर लावून हनुमान चालीसा लावा.


ही बातमी देखील वाचा


Raj Thackeray Live: 'उद्धव ठाकरेंच्या अंगावर एकतरी केस आहे का?' राज ठाकरेंच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे