मुंबई : रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दसऱ्याच्या मूहूर्तावर मुंबईच्या लोकल प्रवाशांना खास भेट दिली आहे. येत्या दसऱ्यापासून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर लोकलच्या 60 फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. विशेषत: गर्दीच्या वेळेत लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार असल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.


पश्चिम रेल्वेवर 32, तर मध्य रेल्वेवर लोकलच्या 28 नव्या फेऱ्या सुरु होणार आहेत. यामध्ये हार्बरवरील 14, तर ट्रान्स हार्बर मार्गावरील 14 फेऱ्यांचा समावेश आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मात्र लोकलच्या नव्या फेऱ्या नसतील.

लोकलमधून पडून होणाऱ्या मृत्यूंचा वाढता आकडा पाहून सीएसएमटी आणि कल्याण स्थानकादरम्यान लोकल सेवा करण्यावर गोयल यांचा भर होता. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी ठाणे आणि कल्याण स्टेशनपूर्वी 12 लोकल फेऱ्या सुरु करण्याची तयारी केली होती. मात्र हा प्रस्ताव नोव्हेंबरपर्यंत लांबण्याची शक्यता आहे.

अधिकृतरित्या एल्फिन्स्टन रोड स्टेशनचं नाव प्रभादेवी, तर सीएसटीचं नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करण्याचा रेल्वेमंत्र्यांचा प्रयत्न आहे. दोन्ही स्थानकांवर एस्कलेटर आणि एलिव्हेटरही सुरु करण्यात येणार आहेत.