भिवंडी : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी त्यांच्याविरोधात सुरु असलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी भिवंडी न्यायालयात मंगळवारी सकाळी 11 वाजता हजर राहतील. यावेळी हा दावा समरी ट्रायल प्रमाणे न चालवता तो समन्स ट्रायल प्रमाणे चालवावा, या अर्जावर सुनावणी होणार आहे.


या सुनावणीत दोषारोप न्यायालयासमोर मांडले जाणार असून प्रिन्सिपल सिव्हिल जज शेख यांच्याकडे सुनावणी होणार आहे. यामुळे राहुल गांधींच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

महात्मा गांधीजींची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच घडवून आणली, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी सहा मार्च 2014 रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिवंडीत केलं होतं. या वक्तव्याविरोधात आरएसएसचे शहरजिल्हा कार्यवाहक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली.

या याचिकेत न्यायालयाकडून आरोप निश्चितीसाठी राहुल गांधी यापूर्वी भिवंडी न्यायालयात हजर झाले होते. त्यावेळी न्यायालयात त्यांच्या वकिलांनी केवळ वृत्तपत्राच्या कात्रणावरून याचिका दाखल करून गुन्हा नोंदवण्यात आला, अशी बाजू मांडली होती. त्यामुळे कायदेशीरपणे गुन्ह्याचे स्वरूप उघड होत नसल्याने संपूर्ण कागदपत्र उपलब्ध करावेत, अशी मागणीही न्यायालयाकडे करण्यात आली.

कसा असेल राहुल गांधींचा मुंबई दौरा?

भिवंडी कोर्टातील सुनावणी झाल्यानंतर राहुल गांधी पक्षाच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त असतील. मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी याबाबत माहिती दिली.

दुपारी सव्वा तीन वाजता राहुल गांधींची गोरेगावमध्ये सभा होईल.

काँग्रेसकडून ऑफलाईन आणि ऑनलाईन कॅम्पेन सुरु करण्यात येत आहे, ज्याचं नाव प्रोजेक्ट शक्ती असं आहे. याचं अनावरण राहुल गांधी करतील आणि एक व्हिडीओ रिलीज करतील.

प्रत्येक बूथ कार्यकर्ता त्यांचं व्होटर आयडी राहुल गांधी यांना पाठवतील

तीन प्रकारचं साहित्य कार्यकर्त्यांना दिलं जाणार आहे.

फडणवीस सरकारच्या भ्रष्टाचाराच्या असणाऱ्या गोष्टी पुस्तकाच्या रुपात दिल्या जाणार आहेत. यात पंकजा मुंडे, गिरीश बापट, रवींद्र वायकर, एकनाथ खडसे, विष्णू सावरा, दीपक सावंत, विनोद तावडे, तसेच चहा घोटाळा, उंदीर घोटाळा, समृद्धी घोटाळा याचा या पुस्तकात समावेश असेल.

मोदी सरकार चार वर्षात कसं अपयशी ठरलं हे पुस्तक कार्यकर्त्यांना दिलं जाणार आहे, ज्याचं नाव विश्वासघात असं आहे.

तिसरं डॉक्युमेंट मुंबई महापालिकेवर असेल, जे चार पानांचं आहे. रस्ते, नालेसफाई, शिक्षण, आरोग्य या विषयांचा त्यात समावेश आहे.