मुंबई : मान्सूनच्या पहिल्याच पावसात मुंबईत पाणी तुंबलं. पाणी साचल्यामुळे रस्त्यावरही वाहतूक कोंडी झाली. मात्र लोकल रेल्वेची वाहतूक उशिराने का होईना सुरुच होती. मुसळधार पावसातही मध्य रेल्वेची वाहतूक फक्त योग्य नियोजनामुळे सुरु राहिली. म्हणूनच मुंबईकरांना लोकलमध्ये पावसात अडकून राहण्याची वेळ आली नाही.


हवामान विभागाने इशारा दिल्याप्रमाणे मुंबईत मुसळधार पाऊस झाला. काही भागात तर शंभर मिमीपेक्षाही जास्त पाऊस होता. सायन, कुर्ला, सँडहर्स्ट रोड या स्टेशनमध्ये रेल्वे रुळावर पाणी साचलं होतं. मात्र तरीही मध्य रेल्वे ठप्प झाली नाही. उशिराने का होईना वाहतूक सुरुच होती.

मध्य रेल्वेने काय पूर्वतयारी केली?

जुन्या गाड्या, ज्या पावसात मोटरमध्ये पाणी जाऊन बंद पडतात, त्या आधीच वेगळ्या करून दिवसभर वापरल्या नाहीत. त्यासाठी आधीच मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली गेली आणि कोणत्या गाड्या चालू ठेवायच्या ते ठरवण्यात आलं. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे पावसात लोकल बंद पडल्या नाहीत.

यावर्षी मध्य रेल्वेच्या ताफ्यात नव्या बम्बार्डियर लोकल दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये नवीन तंत्रज्ञान आहे. सोबत पाणी रुळावर आलं तरीही या लोकल सावधरित्या चालवता येतात. पावसात या लोकल बंद पडत नाहीत. त्यामुळे याच गाड्यांचा पावसात जास्त वापर केला गेला.

हवामान विभाग आणि बीएमसीसोबत समन्वय

मध्य रेल्वे आणि हवामान विभाग यांनी अचूक समन्वय साधला. हवामान खात्याने रियल टाईम अपडेट, म्हणजेच प्रत्येक तासाचे वेगवेगळ्या ठिकाणी पडणाऱ्या पावसाचे अंदाज रेल्वेला सांगितले. यामुळे त्या-त्या ठिकाणी त्या-त्या वेळी गाड्यांचे आणि कामाचे नियोजन केले गेले. याचा मोठा फायदा झाला.

त्याचबरोबर मुंबई महापालिकेनेही नालेसफाई आणि पंप लावण्यात मदत केली. मध्य रेल्वे आणि बीएमसीने मिळून नालेसफाई केली. तसेच दोन्ही विभागांनी मिळून 26 जागी 60 पंप लावले. यामुळे पाण्याचा निचरा लवकर झाला.

जलद निर्णय प्रक्रिया

ज्या ठिकाणी पाणी हमखास भरते, त्या स्टेशनवर मोठे अधिकारी एक टीम सोबत घेऊन हजर राहिले. यामुळे निर्णय प्रक्रिया जलद झाली.

मध्य रेल्वेने यावर्षी मोठ्या प्रमाणात नालेसफाई केली. त्यासाठी बीएमसीकडून सल्लेही घेण्यात आले. त्यामुळे वर्षानुवर्षे साचलेले नाले साफ झाले.

हार्बर रेल्वे सुरु ठेवण्यातही यश

मध्य रेल्वेच्या सोबत हार्बर रेल्वेही सुरु ठेवण्यात मध्य रेल्वेला यश आलं. त्यासाठी अनेक प्रवाशांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मध्य रेल्वेचे आभार मानले. भरपावसात विनाअडथळा हार्बर रेल्वे सुरु होती. गाड्या उशिराने असल्यामुळे थोडा फार त्रास झाला, मात्र हार्बरची लोकल कुठेही रखडली नाही.

प्रचंड पावसात रेल्वे वाहतूक सुरु ठेवली याचं श्रेय मध्य रेल्वेला द्यावेच लागेल. मात्र ही फक्त सुरुवात आहे. अजून संपूर्ण पावसाळा बाकी आहे. त्यामुळे साखळी सामन्यात मिळवलेलं हे यश मध्य रेल्वेला यापुढेही कायम ठेवावं लागणार आहे.