मुंबई : अग्नितांडवाच्या वाढत्या घटनांनी मुंबईतल्या विविध आस्थापनांच्या फायर ऑडिटवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. कमला मिल दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने शासकीय आणि निमशासकीय इमारतींना फायर ऑडिट करणं बंधनकारक केले होतं. पण, अग्नितांडवाचं शहर बनलेल्या मुंबईत फायर ऑडिटला प्रशासन आणि मुंबईकरसुद्धा फार गांभीर्यानं घेत असल्याचं दिसत नाही.


मुंबईत मरण अगदी सोपं झालं आहे हे काही वेगळं सांगायला नको. आग लागण्याच्या घटना तर मुंबईत सवयीच्या झाल्या आहेत. कमला मिलमधील वन अबाव्ह आणि मोजो ब्रिस्टो या रेस्टोपबला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला होता. यावेळी पालिकेने अग्नी सुरक्षेवर उपाय योजना सुचवल्या होत्या पण त्या आता पर्यंत कागदावरच राहिल्या आहेत.

कमला मिल, कुर्ला भानुशाली आग दुर्घटनेनंतर पालिकेने मुंबईत 34 अतिरिक्त फायर ऑफिसर नेमले होते. मुंबईतील फायर ऑडिट तपासणी करणं हे त्याच काम होतं, पण असं होताना दिसत नाही. मुंबईत शासकीय निमशासकीय इमारतींचं फायर ऑडिट करुन घेणं बंधनकारक केलं होतं. 2019 मध्ये 1402 आग लागण्याच्या घटना झाल्या आहेत, ज्यात 91 जण जखमी झाले असून 10 जणांचा मृत्यू झाला.

मुंबईत सरकारच्या अखत्यारितील इमारतींचंच फायर ऑडिट रखडलं आहे. त्यामुळे, मुंबईतल्या इतर इमारतींच्या अवस्थेची कल्पना न केलेली बरी. नियमानुसार इमारतीतील अग्निशमन यंत्रणा दर सहा महिन्यांनी ऑडिट करून संबंधित विभागाकडे जमा करणे आवश्यक आहे. मात्र अनेक सोसायट्या याकडे अनेक वर्ष लक्ष देत नाहीत. राज्यभरात अशा 588 परवानाधारक एजन्सी आहेत. या एजन्सीपैकी 240 मुंबईभरात आहेत. मुंबईत अनेक इमारती ऑडिट करत नाहीत.

मुंबईतील शासकीय निमशासकीय इमारतीचे फायर ऑडिट करून घेणं गरजेचं आहे. सर्व इमारती नागरिकांनी सुद्धा आपल्या इमारतीच फायर ऑडिट करुन रिपोर्ट अग्निशमन दलाकडे सोपवणं गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी पालिका फायर ऑडिट करेल अस नाही त्या-त्या आस्थापनाची जबाबदारी आहे

गेल्या काही वर्षातील आगीच्या मोठ्या दुर्घटना

  • कुर्ला पश्चिम येथील सीएसटी रस्त्यावरील कपाडिया नगरच्या रद्दी सामानाने लागलेल्या 20 -25 गोदामाना गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागली.

  • सीएसटी-मशिद स्थानकाजवळील झोपडपट्टीला भीषण आग लागली. या आगीमुळे काही वेळ रेल्वे गाड्याही थांबवण्यात आल्या. या आगीत सहा ते सात मुले जखमी झाली.

  • गिरगावातल्या काकडवाडीत आग लागली. येथे तळमजल्य़ातील लॉंड्रीतल्या कपड्यांनी पेट घेतला (सकाळी) ही आग पहिल्या मजल्यापर्यंत गेली व त्यात एका कुटुंबातील दोघं जखमी झाली तर एकाचा मृत्यू झाला.

  • नायर रुग्णालयातील ईएनटी विभागाच्या इमारतीला शॉर्टसर्किटमुळे भर दुपारी मोठी आग लागली. ती विझवायला तीन तासाहून अधिक वेळ लागला. या आगीत विद्युत यंत्रणांचे नुकसान झाले.

  • चेंबुरच्या आर के स्टुडिओत दोन सेट जळून खाक झाले. येथे आग विझवणारी अग्निशमन यंत्रणा काम करीत नव्हती. यावेळी चित्रीकरण नसल्याने मोठी दुर्घटना टऴली.

  • विलेपार्ले येथील सागर ज्योती इमारतीत आग लागली. या आगीत काहीजण जखमी झाले.

  • जवाहरव्दीप व बुचर बेटावरच्या बीपीसीएल टाकीवर वीज पडून मोठी आग लागली. 30 हजार मेट्रिक टनाच्या टाकीत हायस्पीड डिझेल ठेवलेले होत, ते जळलं.

  • वांद्रे पूर्व येथील गरीब नगर- बेहराम पाडा झोपडपट्टीला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या. यांत तीघे जखमी झाले आहेत.

  • दोन महिन्यांपूर्वी विलेपार्ले येथील सागर ज्योती या इमारतीत भीषण आग लागली. ही आग विझवताना एक जवान जखमी झाला.

  • साकीनाका खैरानी रोडवरील भानू फरसाण दुकानाला लागलेल्या भीषण आगीत आज १२ कामगार होरपळून ठार झाले.

  • कमला मिल दुर्घटना 14 जणांचा मृत्यू

  • अंधेरी कामगार रुग्णालयात लागलेली आग , यात सहा ज्यांचा मृत्यू झाला होता

  • एमटीएनएल मधील भीषण आग , यात 84 जणांना सुखरूप वाचवण्यात यश