मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने मंगळवारी सुमारे 2 हजार पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात अटकेत असलेल्या तिन्ही महिला डॉक्टरांविरोधात भक्कम पुरावे सादर केल्याची माहिती आहे. ज्यात पीडितेच्या मोबाईल फोनमध्ये सापडलेल्या सुसाईड नोटचा तपशीलही देण्यात आला आहे.


दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात आरोपींनी दाखल केलेल्या जामिनासंदर्भात दाखल केलेल्या अपीलावर न्यायमूर्ती डी. एस. नायडू यांच्यापुढे सकाळच्या सत्रात सुनावणी झाली. ज्यात विशेष सरकारी वकिल राजा ठाकरे यांनी आज आरोपपत्र दाखल होत असल्यानं तूर्तास ही सुनावणी तहकूब करण्याची विनंती कोर्टाकडे केली. जी मान्य करत हायकोर्टानं गुरूवारी यावर सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे. मात्र आरोपी अजूनही तपासात सहकार्य करत नसल्याचं सरकारी वकिलांनी हायकोर्टाला सांगितलं. तसेच आरोपींना जामीन मिळाल्यास त्या या खटल्यातील पुराव्यांशी छेडछाड करून साक्षीदारांवर दबाव आणू शकतात असा दावा या अर्जाला विरोध करताना करण्यात आला आहे.

डॉ. पायल तडवीने 22 मे रोजी नायर रुग्णालयाच्या वसतीगृहामध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्यावर सतत जातीवाचक शेरेबाजी करुन तिचा मानसिक छळ केल्यामुळे तिने आत्महत्या केली, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केल्यामुळे पोलिसांनी 23 मे रोजी गुन्हा नोंदवून नायर हॉस्पिटलमधील तिच्या तीन सहकारी महिला डॉक्‍टरांना अटक केली आहे. यामध्ये डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांचा समावेश आहे. आग्रीपाडा पोलिसांनी तिन्ही डॉक्‍टरांवर रॅगिंग आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.