मुंबई : संपूर्ण राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे राज्यातील बहुतांश उद्योग धंदे बंद पडलेत. तर लाखो लोकांचे रोजगार गेलेत. यामध्ये लोककलावंतांवर देखील उपासमारीची पाळी आली. अशावेळी सरकारने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे, या मागणीसाठी बुधवारी 16 सप्टेंबर रोजी शिवाजी पार्क चैत्यभूमी या ठिकाणी फेडरेशन ऑफ आर्टिस्ट असोसिएशन यांच्या वतीने कलावंतांचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातील दोन हजाराहून अधिक विविध क्षेत्रातील कलाकार सहभागी झाले होते.
राज्यातील वेगवेगळ्या कला क्षेत्रातील लोकशाहीर तमाशा कलावंत, नाट्यकलावंत, कीर्तनकार, भारूडकार, भजनी मंडळ, साहित्यिक, लेखक, गीतकार, कवी, शायर, हिंदी-मराठी-गुजराती-पंजाबी-तेलुगू-तमिळ-कन्नड आणि इतर भाषेत पार्श्वगायक, लोकगीत गायक, कव्वाल इत्यादी तंत्रज्ञान - निर्मात्यांच्या विविध संघटनांना एकत्रित करून फेडरेशन पार्टी स्थापन करण्यात आली आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे प्रचंड आपत्कालीन परिस्थितीमधून जात असल्यामुळे या विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू नये म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. परंतु, गेल्या पाच महिन्यांपासून या लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद पडले आहेत. तर कलावंतांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे या कलावंतांची राज्य सरकारने दखल घ्यावी आणि त्यांना योग्य ती मदत व सहकार्य करावे, अशी मागणी फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
कोरोनाचे संक्रमण वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी आणली. सार्वजनिक ठिकाणी आणि बंदिस्त सभागृहांमध्ये हे कार्यक्रम करण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे या कार्यक्रमांवर रोजीरोटी कमावणाऱ्या हजारो कलाकारांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली. कले व्यतिरिक्त इतर कुठलाही व्यवसाय नसल्यामुळे कलाकार तंत्रज्ञांचे जगणे मुश्कील झालं आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ते काटकसरीनं आपला संसार चालवत होते. मात्र त्यांच्याजवळ असलेली रक्कम आता पूर्ण संपल्यामुळे इथून पुढं कसं जगायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे. राज्य सरकारने या कलाकारांना त्यांचे कार्यक्रम सादर करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या कलाकारांनी केलेली आहे. राज्य सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं आणि कार्यक्रम सादर करण्याची परवानगी दिली नाही, तर राज्यभरातील हजारो कलाकार पुन्हा एकत्र येऊन मोठं आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या मोर्चाच्या दरम्यान देण्यात आलेला आहे.
कोरोना काळात अनेकांचे उद्योग धंदे बंद पडलेत. यामधून कलाकारही वाचलेले नाहीत. राज्यातील कलाकारांनी या राज्य सरकारच्या आदेशांचे पालन करत गेली सहा महिने ते घरात बसून आहेत . कलाकार आपल्या उपजीविकेसाठी कले व्यतिरिक्त इतर कुठलाही व्यवसाय करत नाहीत. राज्यकर्ते त्यांच्या कार्यक्रमांमध्ये कलाकारांना बोलून त्यांच्या कार्यक्रमाची शोभाही वाढवत असतात. आता याच कलाकारांना समोर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने कलाकारांच्या मागण्यांकडे त्वरित लक्ष देऊन त्यांना मदत करणं तितकंच गरजेचं आहे, असं अभिनेते विजय पाटकर यांनी म्हटलं.
कलेचे आणि कलाकारांचे अनेक प्रकार आहेत. तसेच कलाकारांच्या पाठीमागे बॅकस्टेज आर्टिस्ट देखील मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. राज्यातील लाखो कलाकार केवळ कलेवर जगत आहेत. कोरोनामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती अधिक खालावत चाललेली आहे. या संदर्भात अनेक वेळा राज्य सरकारकडे निवेदन सादर करून कलाकारांची परिस्थिती आम्ही दाखवून दिलेली आहे. हॉटेल , कार्यालय ज्या पद्धतीने सुरू झालीत त्याच पद्धतीने आता आम्हा कलाकारांना कला सादर करण्यासाठी आमच्या कार्यक्रमांना परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही वारंवार करीत आहोत. मात्र राज्य सरकार त्याकडे एक गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने आता कलाकारांना जगवण्यासाठी त्यांच्या कार्यक्रमांना परवानगी द्यावी, अशी विनंती समन्वयक व संगीत कला अकादमीचे संस्थापक मनोज संसारे यांनी केली.