Navi Mumbai Airport Naming Issue : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी शुक्रवारी (24 जून) सर्वपक्षीय कृती समितीतर्फे दि बा पाटील यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त सिडको घेराव आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त या आंदोलनासाठी आले होते. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी हे आंदोलन महत्त्वाचे मानले जात होते. या आंदोलनाला भाजपच्या आमदारांची मोठी उपस्थिती होती, ज्यामध्ये प्रशांत ठाकूर, गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांचा समावेश आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार होण्यासाठी आणखी 3 वर्षांचा कालावधी लागणार असून दि बा पाटील यांचेच नाव विमानतळाला देण्यासाठी सरकारला भाग पाडू असा निश्चय यावेळी करण्यात आला. यासोबतच दरवर्षी दिबांच्या स्मृतिदिनानिमित्त हे आंदोलन धगधगत ठेऊया, असा एल्गार यावेळी कृती समितीतर्फे करण्यात आला.


विमानतळाच्या नामकरणावरुन राजकीय वाद
गेल्या काही महिन्यांपासून नवीमुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरुन स्थानिक सर्वपक्षीय कृती समिती प्रकल्पग्रस्त विरुद्ध राज्य सरकार असा वाद सुरु आहे. नवी मुंबईचे निर्माण हे स्थानिक आगरी-कोळी-कराडी प्रकल्पग्रतांच्या जमिनीवर करण्यात आलं आहे. याच जमिनीवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार असून या विमानतळाच्या नामकरणावरुन राजकीय वाद सुरु झाले आहेत. त्यातच, नवी मुंबईची प्लॅनिंग ऑथोरिटी असलेल्या सिडकोने या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा ठराव केला. तर, राज्य सरकार देखील बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासाठी आग्रही असल्याने स्थानिक भूमीपुत्रांनी या निर्णयाला विरोध केला आहे. स्थानिक भूमीपुत्र एकत्रित येत प्रकल्पग्रस्तांचे नेते आणि  सिडको आंदोलनातून संपूर्ण देशाला न्याय देणाऱ्या दि. बा. पाटील यांच्या नावाची आग्रही मागणी करत आहेत.


कोण होते दि बा पाटील?



  • दि बा पाटील यांचा जन्म 13 जानेवारी 1926 रोजी जासई , उरण येथे झाला

  • वकिलीचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी शेतकरी कामगार पक्षातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली 

  • पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे ते चार वेळा आमदार होते. 

  • रायगड लोकसभेचे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.

  • 1999 मध्ये दि बा पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करत लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता. यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून संन्यास घेतला.

  • सिडकोने 1970 साली नवी मुंबई शहराची उभारणी करण्यासाठी नवी मुंबई, पनवेल उरण भागातील 97 गावांच्या जमिनीचा ताबा घेतला होता. घेतलेल्या जमिनीच्या बदल्यात तुटपुंजी मदत आगरी-कोळी जनतेला केली होती.

  • याला विरोध करत दि बा पाटील यांच्याकडून आंदोलन उभे करण्यात आले. यात 5 शेतकरी हुतात्मे झाले. तर 100 जण जखमी झाले होते.

  • अखेर महाराष्ट्र सरकारने याची दखल घेत भरीव मदत करण्यास सुरवात केली. घेतलेल्या जमिनीच्या बदल्यात 12.5 टक्के विकसीत भूखंड देण्यात आले.

  • जेएनपीटी बंदराच्या उभारणीतही शेतकरी वर्गाच्या जमिनी घेतल्यानंतर दि बा पाटील यांनी वयाच्या 87 व्या वर्षी ॲम्ब्युलन्समधून येत आंदोलन केले होते.

  • शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी आयुष्यभर झटणारे दि.बा.पाटील यांचे 24 जून 2013 रोजी निधन झाले.