Mumbai Water Supply: मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये दमदार पावसाअभावी पुरेसा पाणीसाठा नसल्याने सोमवारपासून (27 जून 2022) संपूर्ण मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 10 टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी महानगरपालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्यात देखील ही 10 टक्के कपात लागू राहणार आहे. यंदाचा पावसाळा सुरू होऊन देखील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रांमध्ये अत्यंत कमी पर्जन्यवृष्टी झाली आहे. जून महिन्यात मागील वर्षाच्या तुलनेत सरासरीपेक्षा सुमारे 70 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. 


मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयामध्ये मिळून संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर इतका असावा लागतो. त्या तुलनेत आज या सर्व सात जलाशयांमध्ये मिळून फक्त 1 लाख 41 हजार 387 दशलक्ष लिटर म्हणजे 9.77 टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी आजच्याच दिवशी हा जलसाठा 15.54 टक्के इतका होता. 


दमदार पावसाअभावी हीच परिस्थिती यापुढेही सुरू राहिल्यास मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता, दमदार पाऊस होऊन मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये उपयुक्त जलसाठ्याची स्थिती सुधारेपर्यंत, मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सोमवारपासून दहा टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी महानगरपालिका आणि इतर गावांना जेवढा पाणीपुरवठा केला जातो, त्यामध्ये देखील ही 10 टक्के कपात लागू राहणार आहे. महापालिकेने मुंबईकरांना पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती पाहता दैनंदिन पाणी वापर काटकसरीने आणि काळजीपूर्वक करावा असं आवाहन केलं आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Motivational Story of Pratiksha Tondwalker : जिथे सफाई कामगार म्हणून नोकरीची सुरुवात, तिथेच मॅनेजर पदांपर्यंत झेप
Maharashtra Political Crisis: शिवसैनिक होऊ शकतात आक्रमक, राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना हाय अलर्ट राहण्याचे आदेश