मुंबई : वैद्यकीय अभ्यासक्रमाला ( Private Medical Colleges)  प्रवेश घेणाऱ्या  विद्यार्थ्यांना सावध करणारी ही बातमी आहे.  जर खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत असाल तर तुमच्याकडून  भरमसाठ फी तर वसूल केली जात नाहीये ना? याची शहानिशा करा... कारण तुम्ही एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यू, एसईबीसी या कॅटेगिरीमधून जरी असाल तरी तुम्हाला काही खाजगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये फी मध्ये सवलत असताना देखील पूर्ण फी भरावी लागण्याची शक्यता आहे. शिवाय, अनामत रक्कम म्हणून खाजगी वैद्यकीय महाविद्यालय लाखो रुपये विद्यार्थ्यांकडून घेत असल्याच्या तक्रारी  एफआरएकडे प्राप्त झाल्या आहेत.   त्यामुळे एफआरएच्या सूचना असताना आणि कॅटेगरीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना फी सवलत असताना  या कॉलेजची ही मनामानी का ? त्याचं नेमकं कारण काय आहे ? पाहूया 


वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत.  मात्र, तुम्ही खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेत असाल तर  विशेष लक्ष द्यावे लागेल. कारण तुम्ही एससी, एसटी,ओबीसी  या कॅटेगरीमध्ये असाल किंवा तुम्ही आर्थिक दुर्बल घटकात असाल आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला फीमध्ये सवलत मिळत आहे.  तर एकदा या नोटीसकडे आणि भरून घेतल्या जाणाऱ्या प्रतिज्ञापत्राकडे लक्ष द्या... यामध्ये प्रतिज्ञापत्र आणि नोटीसीमध्ये स्पष्ट लिहिले आहे की, तुम्ही जरी कॅटेगिरीमध्ये प्रवेश घेत असाल किंवा तुम्ही जरी आर्थिक दुर्बल घटकात असाल  तरी राज्य सरकारकडून डिसेंबर 2024 पर्यंत राज्य सरकारकडून मिळणारे  पैसे अर्थात निधी  जर मिळाला नाही तर  फी मध्ये सवलत असताना देखील पूर्ण फी भरावी लागणार आहे. यामुळे असंख्य विद्यार्थ्यांची आणि पालकांची झोप उडाली आहे. कारण ऐनवेळी लाखो रुपये आणायचे कुठून? असा प्रश्न पालकांसमोर उभा आहे...


प्रवेश घेतल्यानंतर अडचणी येऊ नये यासाठी ओळख लपवली आहे . आर्थिक दुर्बल घटकात येत असल्याने पाच लाख रुपये फी आहे मात्र जर  डिसेंबर 2024 पर्यंत राज्य सरकारने कॉलेजला पैसे दिले नाही तर आम्हाला 14 ते 15 लाख रुपये पैसे भरावे लागतील.  एवढे पैसे आणणार कुठून आहे, असा सवाल विद्यार्थी विचारत आहे. 


साधारणपणे खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या  एम बी बी एस प्रथम वर्ष फी स्ट्रक्चर काय आहे ? 



  • ओपन कॅटेगिरी - 14 लाख 

  • ई डब्ल्यू एस /ई बी सी  - 10 लाख 

  • ओबीसी - 10 लाख 40 हजार 

  • एससी एसटी - 5 लाख 60 हजार 

  • व्हीजे /एनटी - 6 लाख 40  हजार 


 त्यामुळे जर डिसेंबर 2024 पर्यंत राज्य सरकारकडून पैसे प्राप्त न झाल्यास या विद्यार्थ्यांना पाच ते दहा लाख फी भरायची होती.  त्या फीमध्ये सवलत मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना 14 लाख रुपये भरावे लागतील . याविषयी माहिती घेतली असता खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांचे सरकारकडून मागील काही वर्षांचे कोट्यावधी रुपये येणे बाकी आहे.  त्यामुळे जर डिसेंबर 2024 पर्यंत राज्य सरकारकडून पैसे प्राप्त झाले नाहीत तर मग या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांचा खर्च भागवायचा कसा? असा प्रश्न कॉलेज समोर आहे. मात्र महाविद्यालय येथेच थांबत नाहीत नाही तर अनामत रक्कम पन्नास हजारापेक्षा जास्त कॉलेजकडून घेतली जात नसताना काही महाविद्यालय मात्र एक ते दोन लाख रुपये घेत आहेत.  ज्यामध्ये विद्यार्थ्यांना मेस आणि होस्टेलच्या सुविधांचे पैसे सुद्धा देणे बंधनकारक आहे. 


 महाविद्यालयांना नोटीस पाठवणार


 शुल्कनियामक प्राधिकरणाने नवीन गाईडलाईन जारी केले असले तरी त्याचं पालन कुठेही केलं जात नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत आहेत. 
विद्यार्थ्यांच्या  या सगळ्या बाबत  राज्यातील शुल्क नियामक प्राधिकरणाकडे तक्रारी केले आहेत. FRA ने  सुद्धा या सगळ्या बाबत गंभीर दखल घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन  महाविद्यालयांना नोटीस पाठवणार असल्याचे सुद्धा एफआरएकडून सांगण्यात आले आहे 


खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आणि राज्य सरकार यांच्यातील गोंधळाचा मोठा फटका


आता या सगळ्या प्रकरणावर संबंधित महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधला असता याबाबत बोलण्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचे कारण दिले आहे. तर काहींनी राज्य सरकारकडून आधीचे पैसे येणे बाकी असल्यामुळे  अडचण निर्माण झाली आहे आणि त्यामुळे असा निर्णय घेत असल्याचा सांगितलं. हे खाजगी वैद्यकीय महाविद्यालय  आणि राज्य सरकार यांच्या सुरू असलेल्या गोंधळाचा मोठा फटका गरीब घरातील त्यासोबतच कॅटेगिरीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना बसताना दिसत आहे.  यामध्ये प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून सुद्धा आपल्या अधिकारांपासून हे विद्यार्थी वंचित राहत आहेत.