Mumbai Malad Accident News : मुंबई : मुंबईत (Mumbai News) पुन्हा एकदा एका महागड्या कारनं एका निष्पाप महिलेचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. महागड्या गाडीनं महिलेला चिरडल्यामुळे झालेल्या अपघातानं मालाड (Malad Crime News) हादरलं आहे. दुर्दैवी बाब म्हणजे, एका निष्पाप महिलेचा या अपघातात हकनाक बळी गेला आहे. भरधाव गाडीनं महिलेला धडक दिली, त्यानंतर तसंच तिला डिव्हायडरपर्यंत फरफटत नेलं. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे. 


काही दिवसांपूर्वी वरळी हिट अँड रन अपघातानं मुंबई पुरती हादरून गेली होती. बड्या बापाच्या लेकानं आपल्या महागड्या कारनं एका महिलेला फरफटलं होतं, यामध्ये महिलेचा मृत्यू झाला होता. असाच काहीसा प्रकार मालाडमध्येही घडला आहे. भर वर्दळीच्या रस्त्यावर घडलेल्या अपघातामुळे एकच खळबळ माजली आहे. अपघातानंतर नागरिकांनी कारचालकाला घेरलं आणि बेदम मारहाण केली. यामुळे कारचालकही जखमी झाला आहे. तर, संतप्त जमावानं गाडीचीही तोडफोड केली आहे. 


महिलेला गाडीखाली चिरडल्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी नागरिकांकडून चालकाला बेदम मारहाण केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भरधाव वेगानं कार चालवून महिलेला उडवणारा कारचालक मर्चंट नेव्हीमध्ये सेवेला आहे. जमावाकडून मारहाण झाल्यानंतर चालक देखील गंभीर जखमी झाला आहे. चालकानं मद्यपान केलं होतं किंवा नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.  मालाड पोलिसांनी चालकाचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. अहवाल आल्यानंतर कारचालकानं मद्यपान केलं होतं की, नाही ते स्पष्ट होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 


नेमकं घडलंय काय? 


पोलिसांच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मालाड परिसरात काल (मंगळवारी) रात्री भरधाव कारनं दिलेल्या धडकेत 27 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. आरोपी चालकानंच जखमी महिलेला रुग्णालयात नेलं, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मालाड पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, मेहंदी क्लास संपवून पायी घरी जात असताना जाणाऱ्या 27 वर्षीय महिलेला कारनं धडक दिली आहे. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. मेहंदी क्लास संपवून ती घरी परतत होती, तेवढ्यात एका आलीशान कारनं तिला जोरदार धडक दिली. महिलेला धडक दिल्यानंतरही आरोपीनं गाडी थांबवली नाही. त्यानं महिलेला डिव्हायडरपर्यंत फरफटत नेलं. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर प्रत्यक्षदर्शी आणि कार चालकाने महिलेला रुग्णालयात दाखल केले, पण उपचारापूर्वीच महिलेचा मृत्यू झाला होता.