मुंबई : मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रान्चच्या युनिट 5 ने एक टोळीचा पर्दाफाश केला आहे जी अवैधरित्या लोकांची वैयक्तिक माहिती काढून तपास करत होते. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सात खासगी डिटेक्टिव्हना अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शैलेश मांजरेकर आणि राजेंद्र साहू यांना मुंबईतील गोरेगावमधून, सौरभ साहू आणि यासीन अन्सारीला दिल्लीतून, विष्णु दास गोस्वामीला ओदिशामधून तर योगीशा पुजारी आणि दिनेश विश्वकर्माला बंगळुरुमधून अटक करण्यात आली आहे.
याच प्रकरणात मुंबईतील कॉस्मोपॉलिटन डिटेक्टिव्ह एजन्सी, दिल्लीची ऑल इंडिया डिटेक्टिव्ह, ओदिशाची आरगुस स्पाय अँड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड, आणि कर्नाटकची सुपर डिटेक्टिव्ह एजन्स क्राईम ब्रान्चच्या रडारवर आहे.
क्राईम ब्रान्चला माहिती मिळाली होती की, अशी खासगी डिटेक्टिव्ह एजन्सी आहे जी अवैधरित्या लोकांची वैयक्तिक माहिती गोळा करते, सोबतच त्यांच्या मोबाईल कॉल रेकॉर्डची नोंद करते.
कॉल डिटेल्स रेकॉर्डिंग लीक प्रकरणी महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक
यानंतर क्राईम ब्रान्चच्या युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश साईल यांनी एक पथक बनवलं. या टीममधल्या एकाने शैलेश मांजरेकरशी संपर्क साधून सांगितलं की, मित्राच्या पत्नीवर संशय आहे, त्यामुळे तिच्या मोबाईलचा सीडीआर काढायचा आहे.
या माहितीनंतर शैलेश मांजरेकरने होकार कळवला. क्राईम ब्रान्चच्या अधिकाऱ्याने त्याला काही जुने सीडीआर दाखवण्यास सांगितलं. शनिवारी (6 फेब्रुवारी) शैलेश मांजरेकर सीडीआर घेऊन आला असता क्राईम ब्रान्चच्या टीमने त्याला रंगेहाथ अटक केली.
पोलिसांनी या प्रकरणात आयपीसीचे कलम 420, 467, 468, 34 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम 66, 72, 72 (अ) आणि टेलिग्राफ अॅक्टच्या कलम 26 अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला.
जगदीश साईल यांनी सांगितलं की, ही टोळी संपूर्ण भारतात सक्रिय असून मोठ्या प्रमाणात लोकांची वैयक्तिक माहिती गोळा करते. गरज असल्याच वैयक्तिक माहिती गोळा करण्याचा अधिकार केवळ तपास यंत्रणांनाच आहे. परंतु ही टोळी आपल्या आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या लोकांची वैयक्तिक माहिती गोळा करते. अटक केलेल्या आरोपींना आतापर्यंत जवळपास 300 जणांचा सीडीआर काढल्याचं आतापर्यंतच्या तपासात समोर आलं आहे. तर त्यांच्या लॅपटॉपमधून 5 लाखांपेक्षा जास्त एसडीआर जप्त करण्यात आले आहेत.
हे डिटेक्टिव्ह कोणकोणत्या प्रकरणाचा तपास करतात?
क्राईम ब्रान्चला तपासादरम्यान समजलं की, हे लोक गर्लफ्रेण्डचं दुसऱ्या कोणासोबत अफेअर असल्याचा संशय, लग्नाआधी मुलीच्या चारित्र्याचा तपास, किंवा पत्नीच्या चारित्र्यावर संशय अशा प्रकरणाचा तपास हे डिटेक्टव्ह करत होते. हे लोक एक एसडीआर काढण्यासाठी 5 हजार रुपये तर एका सीडीआरसाठी 40 हजार रुपयांपर्यंतची मागणी करायचे. हे प्रायव्हेट डिटेक्टिव एका प्रकरणाच्या तपासासाठी 50 हजारांपासून 5 लाख रुपयांपर्यंतची मागणी करायचे.
आरोपींचा इतिहास
शैलेश मांजरेकरवर ठाणे क्राईम ब्रान्च, मुंबईच्या युनिट 9 आणि अँटी एक्सटॉर्शन सेलमध्ये गुन्हा दाखल आहे.
राजेन्द्र साहू व्यवसायाने कार चालक असून तो कायम शैलेशसोबत असायचा.
सौरभ साहू हा दिल्लीचा रहिवासी आहे. त्याचं शिक्षण केवळ आठवीपर्यंत झालं आहे. तोच या टोळीचा मास्टरमाईंड असल्याचं म्हटलं जातं. त्याच्यावरही तीनपेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद आहे.
यासिर अन्सारीने सिव्हिल इंजीनिअरिंगचं शिक्षण घेतलं असून तो या टोळीचा सदस्य आहे. त्याच्याविरोधात दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल आहे.