मुंबई : प्रसिद्ध प्रायव्हेट डिटेक्टिव रजनी पंडित यांना ठाणे पोलिसांनी दादरमधून अटक केली आहे. त्यांच्यावर काही विशेष लोकांचे कॉल डिटेल्स रेकॉर्डस लीक केल्याचा आरोप आहे. ठाणे पोलिसांनी याआधी चार डिटेक्टिवना अटक केली होती. त्यांच्या तपासातून रजनी पंडित यांचं नाव समोर आलं.


दिल्लीच्या एका अज्ञात व्यक्तीला हाताशी धरुन कॉल डेटा रेकॉर्ड चोरायचा आणि तो लोकांना विकायचा असा धंदा ही टोळी करत होती, असा पोलिसांना संशय आहे.

पोलिसांनी गुरुवारी संतोष पंडगळे आणि प्रशांत सोनावणे या गुप्तहेरांना अटक केली होती. त्यांच्याकडून 177 सीडीआर पोलिसांनी जप्त केल्या होत्यात. त्याच्या तपासादरम्यान शुक्रावारी रजनी पंडित यांना त्यांच्या दादर येथील घरातून अटक करण्यात आली.  रजनी यांनी 5 सीडीआर आरोपी समरेश ननटुन झा उर्फ प्रतीक मोहपाल यांच्या कडून विकत घेतल्याचा आरोप आहे. यासंदर्भात त्यांना अटक करून आता चौकशी सुरु आहे.

त्यांच्या अटकेपाठिमागे आयपीएस लॉबीचा समावेश असण्याची शक्यता पोलीस वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे. येणाऱ्या काळात आणखीन काही अटक करण्यात येतील.

कोण आहेत रजनी पंडित?

भारताच्या पाहिल्या महिला डिटेक्टिव म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे वडील शांताराम पंडित पोलीस खत्यात होते. 1991 साली रजनी यांनी, डिटेक्टिव सर्व्हिस ही कंपनी सुरु करुन डिटेक्टिव म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धि मिळाली.

त्यांच्या टीममध्ये 30 जण आहेत. जे महिन्याला 20 प्रकरणांचा सखोल तपास करुन, त्या प्रकरणाचा छडा लावतात. आतापर्यंत त्यांनी 75 हजार पेक्षा जास्त छडा लावला आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना 50 पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये दूरदर्शनच्या हिरकणी पुरस्काराचा देखील समावेश आहे.

दरम्यान, रजनी पंडित यांच्या कामगिरीनं प्रेरित होऊन त्यांच्यावर काही लघुपटही निघाले आहेत. तर रजनी यांच्या आयुष्यावरची एक तमिळ फिल्मही प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. पण त्यांच्या अटकेनं पोलीस, आणि हायप्रोफाईल वर्तुळात खळबळ उडाली आहे.