Aarey Metro Car Shed Protest : मेट्रो कारशेडच्या मुद्यावरुन राजकारण तापू लागलं आहे. शिंदे सरकारने आरेमध्ये मेट्रोचे कारशेड उभारण्याचे सूतोवाच केल्यानंतर पर्यावरणवाद्यांनी आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. मागील काही रविवारपासून आरेमध्ये पर्यावरणवाद्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. आजही पर्यावरणवाद्यांनी आरे परिसरात आंदोलन सुरू केले.


महाविकास आघाडी सरकारने आरेमधून कारशेड कांजूरला नेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शिंदे सरकार सत्तेत येताच कारशेड आरेमध्येच उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. आरेतील पिकनिक स्पॉटजवळ आज झालेल्या आंदोलनात तरुणांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे. 


आरे मेट्रो कारशेडच्या प्रस्तावित जागेत बिबट्यांचा अधिवास असून इतर प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी यांचा वावर असल्याचे पर्यावरणप्रेमींनी म्हटले आहे. आरेमध्ये असणारी अशी जैवविविधता जपण्याची आवश्यकता असल्याचा मुद्दाही आंदोलकांकडून अधोरेखित करण्यात येत आहे. 


दरम्यान, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केले आहे. मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचा कोणताही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला नव्हता अशी भूमिका सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून मांडली आहे. सर्वोच्च न्यायालयातील याचिकेचा हवाला देत सोमय्यांनी हा दावा केला आहे. 






आरे कारशेड किंवा कुलाबा सीप्झ मेट्रोच्या विरोधात कोणतेही काम थांबवण्याचे आदेश न्यायालयाने दिले नव्हते असं सोमय्यांनी म्हटले. त्याशिवाय, आरे कारशेडचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आता झाडे तोडण्याची गरज नाही, अशी ग्वाही सरकारने दिल्याचं सोमय्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. 


एक लाख कोटींच्या डीलसाठी आरेचा बळी; पर्यावरणवाद्यांचा आरोप


आरेतील मेट्रो-3 चे कारशेड उभारून येथील जमिनीचा व्यावसायिक वापर आणि कांजूरमार्ग येथील पर्यायी जागाही विकासकांना देण्याचा डाव असून  या दोन्ही जागांसाठी सुमारे एक लाख कोटींची डील असल्याचा गंभीर आरोप आरोप 'आरे कन्झर्वेशन ग्रुप'ने (Aarey Conservation Group) शुक्रवारी, पत्रकार परिषदेत केला. कांजूरमार्ग येथील जागा ही मेट्रो-3सह, मेट्रो 4, मेट्रो 6 आणि मेट्रो 14 साठीदेखील फायदेशीर ठरणार असल्याचे दावा आरे बचाव कार्यकर्त्यांनी केला. कांजूरमार्ग येथील जागा ही महाराष्ट्राचीच असताना राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा खासगी मालकीची असल्याचे सांगत दिशाभूल करत असल्याचा आरोपही 'आरे बचाव'च्यावतीने करण्यात आला.