Darbar Hall Raj Bhavan in Mumbai : राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमतेच्या दरबार हॉलचे उदघाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज सकाळी झाले. यावेळी कार्यक्रमाला राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.


दरबार हॉलचे उद्घाटन 8 डिसेंबर रोजीच राष्ट्रपतींच्या हस्तेनिश्चित झाले होते. परंतु तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या आकस्मिक निधनामुळे उदघाटन सोहळा त्यावेळी स्थगित करण्यात आला होता. 
 
राजभवनातील नवीन दरबार हॉल हा जुन्या दरबार हॉलच्या जागेवरच  बांधण्यात आला असून त्याची आसन क्षमता 750 इतकी आहे. जुन्या हॉलची आसन क्षमता 225 इतकी होती. 


जुन्या हॉलची हेरिटेज वैशिष्ट्ये कायम ठेवताना नव्या सभागृहाला बाल्कनी तसेच समुद्र दर्शन घडविणारी गॅलरी अतिरिक्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहे. 


स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजभवनातील दरबार हॉल शपथविधी सोहळे, शासकीय कार्यक्रम, पोलीस पदकदान समारोह, शिष्टमंडळाच्या भेटी  तसेच लहान मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वापरला जायचा. इंग्लंडचे राजे पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या १९११ साली झालेल्या भारत भेटीच्या वेळी दरबार हॉल बांधण्यात आला होता.  त्याची वास्तू रचना तत्कालीन वास्तु रचनाकार जॉर्ज विटेट यांची होती.  


शंभर वर्षांहून अधिक काळ लाटा  व वादळ-वाऱ्यांचे तडाखे सहन केल्यामुळे पूर्वीचा दरबार हॉल अतिशय जीर्ण झाला होता. त्यामुळे 2016 नंतर त्याचा वापर थांबविण्यात व कालांतराने त्याजागी नवा अधिक क्षमतेचा दरबार हॉल बांधण्याचा निर्णय झाला.   


नव्या दरबार हॉलचे बांधकाम 2019 साली सुरु झाले. मात्र कोविडच्या उद्रेकामुळे  बांधकामाची गती मंदावली कालांतराने बांधकाम पुनश्च सुरु झाले व डिसेंबर 2021 मध्ये हॉल बांधून पूर्ण झाला.








LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha