मुंबई: प्रीती राठी अॅसिड हल्ल्याप्रकरणी आरोपी अंकुर पनवारला फाशीची शिक्षा  सुनावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला.


 

मुंबई सत्र न्यायालयाने अंकुर पनवारवरला हत्या आणि अॅसिड हल्ल्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं. कालच दोन्ही पक्षाचा युक्तीवाद पूर्ण झाला होता.  आज न्यायालयाने अंकूरला फाशीची शिक्षा सुनावली.

 

प्रीती राठीवरील हल्ला हा दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा आहे, त्यामुळे आरोपीला फाशीच व्हावी, असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला होता.

 

तर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवल्यानंतर, आरोपीचं वय कमी असल्याने त्याला कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी, आरोपीच्या वकिलांनी केली होती.

 

मात्र न्यायालयाने अंकूरने केलेल्या कृत्याला माफी न देण्याचा निर्णय घेत, फाशीची शिक्षा सुनावली.

 

काय आहे प्रकरण?


2 मे 2013 मध्ये  नोकरीनिमित्त मुंबईत आलेल्या प्रीती राठीवर वांद्रे टर्मिनसवर दिल्लीतला तिचा शेजारी अंकुर पनवारनं अॅसिड हल्ला केला होता. कुलाब्यातील मेडिकल कॉलेजमधील लेफ्टनंट पदासाठी देशभरातून १५ जणींची निवड झाली होती; त्यात प्रीतीचा समावेश होता.

प्रीती 2 मे रोजी वडील आणि नातेवाईकांसह गरीब रथ एक्स्प्रेसनं मुंबईत आली होती, तेव्हा वांद्रे टर्मिनसवर अंकुर पनवारनं, पूर्वीचा राग मनात ठेवून तिचा मुंबईपर्यंत पाठलाग केला. त्यानंतर वांद्रे टर्मिनसवर तिच्यावर अॅसिड हल्ला केला होता.

हल्ल्यात तिचे वडील, मावशी, काका आणि अन्य दोन प्रवासीही जखमी झाले होते. तर या अॅसिड हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रीतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

अॅसिड हल्ल्यात प्रीतीच्या यकृताला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

आकसापोटी हल्ला

प्रीती करिअरमध्ये पुढे गेल्याच्या आकसापोटी त्याने हा हल्ला केल्याचं सीबीआय तपासात निष्पण्ण झालं होतं.

प्रीती आणि अंकुरने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला होता. मात्र प्रीतीला नोकरी लागली आणि अंकुर बेरोजगार होता. यामुळे अंकुरचे कुटुंबीय याबाबत त्याला सतत बोलत असत. याचा राग मनात ठेवून अंकुरने प्रीतीवर हल्ला केला.

संबंधित बातम्या


प्रीतीवर अॅसिड फेकणारा आरोपी हत्येप्रकरणी दोषी!