Praveen Darekar: पवई येथे जेव्हीएलआर रोडवर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ताफ्याला आज अपघात झालाय. अंधेरी वरून घाटकोपर येथे कार्यक्रमाला जात असताना एक बाईकवाला मध्ये आला, त्यामुळे हा अपघात झालाय. या अपघातामध्ये प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील गाड्यांचे नुकसान झालंय. नेते प्रवीण दरेकर राज्यातील जनतेचे प्रश्‍न मांडत आहेत, अशा स्थितीत त्यांच्या गाडीला एका महिन्यात तीन वेळा अपघात झालाय. यात घातपाताची शंका वाटत असून याप्रकरणीची चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप नेत्यांकडून केली जात आहे.


गोपीचंद पडळकर यांचा राज्य सरकारला इशारा
प्रवीण दरेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी. सरकारनं चौकशी केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला दिलाय. प्रवीण दरेकर यांच्या गाडीला तीन वेळा अपघात झालाय. यात घातपाताची शंका येत आहे.प्रवीण दरेकर यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला सरकार जबाबदार असेल. त्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केलीय. 


प्रसाद लाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
प्रवीण दरेकर यांच्या वाहनाला अपघात झाल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे. ज्यात त्यांनी म्हटलं आहे की, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते पद हे संविधानाप्रमाणे महत्त्वाचे पद मानले जाते. परंतु विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या पोलीस सुरक्षा गाडीला महिन्याभरात 3 वेळेला अपघात झालाय. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. या घटनांच्या मागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रविण दरेकर मुंबईसह महाराष्ट्रात प्रवास करत असतील त्यावेळेस शासनानं त्यांच्या सुरक्षेची योग्यती काळजी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून वारंवार अपघात होणाऱ्या घटना घडणार नाही.जर असे काही अनूचीत प्रकार घडल्यास यास सर्वस्वी शासन व प्रशासन जबाबदार असेल. माझ्या या निवेदनाजी तत्काळ दखल घेवून यंत्रणेला योग्य ते निर्देश द्यावे. त्याचप्रमाणे आजपर्यंत घडलेल्या अपघाताची उच्च स्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी विनंती प्रसाद लाड यांनी केलीय. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha