मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अभिनेत्री कंगना रनौतवर गंभीर आरोप करत विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचा आरोप कंगनाने केला होता. याविरोधात प्रताप सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली असून हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. ज्या पाकिस्तानचं जगात क्रेडिट नाही त्यांचं क्रेडिट कार्ड घेऊन मी काय करु? असा सवालही यावेळी सरनाईक यांनी केला आहे.


सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, अभिनेत्री कंगनाने एक ट्विट केलं होतं, ज्यामध्ये मुंबईत आल्यानंतर तोंड फोडण्याची गोष्ट करणाऱ्यांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडलं आहे. तिच्या ट्विटच्या आधारे अनेकांनी बातम्या केल्या. ईडीच्या कोणत्याही अधिकाऱ्याने घरी काय सापडलं याची माहिती दिलेली नाही. कंगनाकडून अशा पद्धतीचं बदनामी करणं चुकीचं आहे, असं सरनाईक म्हणाले.


"पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याच्या बातम्या खोट्या, कुठल्याही चौकशीला तयार" - प्रताप सरनाईक


सरनाईक म्हणाले की, ईडीच्या माध्यमातून माझी आणि कुटुंबीयांची संपूर्ण देशभरात बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. अभिनेत्री कंगना रनौत यांनी माझ्याविरोधात खोटं ट्विट केलं. यामुळे कंगना रनौत तसंच त्याबद्दल बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि सोशल मीडिया यांच्याविरोधात मी हक्कभंग दाखल केला आहे. कंगनाच्या ट्विटच्या आधारे ज्या मीडियाने खोट्या बातम्या प्रसिद्ध केल्या त्यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्ताव मान्य करावा अशी विनंती मी अध्यक्षांना केली आहे, अशी माहिती सरनाईक यांनी दिली.


गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरु आहे. त्या चौकशीला सर्वतोपरी आम्ही सहकार्य करत आहोत. ज्यावेळी चौकशीची गरज असेल, शंका असतील त्या निरसन करण्यासाठी दोन तासात हजर राही असं मी ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तर दिली आहेत आणि भविष्यातही देत राहीन, असं देखील सरनाईक म्हणाले.


शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांना आणखी एक धक्का; धाकटे पुत्र पुर्वेश सरनाईकांचीही ईडी चौकशी 


दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक सध्या ईडीच्या फेऱ्यात अडकले आहेत. तसेच त्यांचा मुलगा विहंग सरनाईकही ईडीच्या रडारवर आहे. अशातच प्रताप सरनाईकांना आणखी एक धक्का बसणार आहे. प्रताप सरनाईक यांचे धाकटे पुत्र पुर्वेश सरनाईक यांनाही ईडीनं नोटीस बजावली आहे.