मुंबई : प्रजा फाऊंडेशननं तयार केलेल्या मुंबईच्या हेल्थ रिपोर्टमध्ये अतिशय धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. गेल्या पाच वर्षात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये तब्बल 265 टक्क्यांनी वाढ झाली आहे.


2012-13 मध्ये डेंग्यूचे अवघे 4 हजार 867 रुग्ण होते. मात्र आज डेंग्यूच्या रुग्णांची संख्या तब्बल 17 हजार 771 वर पोहोचली आहे. टीबीचे रुग्णही शहरात झपाट्यानं वाढताना दिसत आहेत. प्रजा फाऊंडेशनच्या अहवालानुसार मुंबईत टीबीमुळे दररोज 18 जणांचा मृत्युमुखी पडतात.

त्याशिवाय डायबेटिस, हायपरटेन्शन आणि इतर आजारांमुळे मुंबईकर अधिक बेजार झाले आहेत. मात्र मेडिकल इन्शुरन्स नसल्यानं 71 टक्के व्यक्ती स्वत:वर नीट उपचारही करु शकत नाहीत.

प्रजा फाऊण्डेशनच्या अहवालातील महत्त्वाच्या गोष्टी :

मुंबईत डेंग्यूचं थैमान

गेल्या पाच वर्षात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये तब्बल 265 % नी वाढ
2012-13 मध्ये 4 हजार 867 रुग्ण, 2016-17 मध्ये ही संख्या 17 हजार 771 वर
डेंग्यूमुळे मृत झालेल्यांची संख्या 77 वरुन 148 वर
टीबीचे दररोज 18 बळी

2016-17 मध्ये दररोज 18 जणांचा मृत्यू टीबीमुळे होतो
टीबीच्या उपचारासाठी रुग्णांची सरकारी DOTS उपक्रमाकडे पाठ
एकीकडे सरकारच्या DOTS उपक्रमा अंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या निम्म्याने घटली
2012 मध्ये DOTS मार्फत 30 हजार 828 रुग्ण उपचार घ्यायचे, ही संख्या 2016 मध्ये 15 हजार 767 झाली, मात्र टीबीच्या रुग्णांमध्ये घट झालेली नाही
2015-16 ला 5 हजार 400 तर 2016-17 मध्ये 6 हजार 472 जणांचे टीबीमुळे मृत्यू
डायबिटीस आणि हायपरटेन्शन

बदलत्या जीवनशैलीमुळे मुंबईतल्या डायबिटीस आणि हायपरटेन्शन च्या रुग्णांमध्येही मोठी वाढ
2016-17 मध्ये डायबिटीसमुळे 2 हजार 675 मृत्यू तर हायपरटेन्शनमुळे तब्बल 4 हजार 438 मृत्यू झाले आहेत
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात 28% कर्मचाऱ्यांची कमतरता
मुंबई महापालिकेच्या आणि राज्य शासनाच्या आरोग्य सेवेवरुन लोकांचा विश्वास उडत चालला आहे.
केवळ 33% नागरिकच शासनाच्या आरोग्य सुविधांचा लाभ घेत आहेत
मुंबईतील 71% कुटुंबांकडे मेडिकल इन्श्युरन्स नाही