Prabhakar Sail Death Drugs Case Updates :  आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणी (drugs Case) अटक केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या पंच प्रभाकर साईल यांचा काल मृत्यू झाला. प्रभाकर साईल यांच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता व्यक्त करत राष्ट्रवादीनं सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. दुसरीकडे प्रभाकर साईल यांच्या आईला याबाबत कल्पना नव्हती. प्रभाकर यांच्या आई हिरावती साईल यांनी अचानक घडलेली घटना काही समजण्यापलीकडची आहे, असं म्हटलंय तर पत्नी पूजा साईल यांनी मला फोन आला मात्र कुणीतरी एप्रिल फुल बनवतंय असं वाटलं, असं सांगितलं.


प्रभाकरची आई हिरावती साईल यांनी म्हटलं की, माझं प्रभाकरशी बोलणं झालं होतं. पण हे अचानकच घडलं जे समजण्यापलीकडे आहे. मला याबाबत अधिकची काहीच माहिती नाही. हे ऐकल्यानंतर मला धक्काच बसला, मी घाबरुन गेलीय. त्याची तब्येत एकदम चांगली होती. असं कसं झालं काय माहीत? असं त्या म्हणाल्या.


आम्हाला काहीही शंका नाही, त्यांचा मृत्यू नैसर्गिक- पूजा साईल


तर प्रभाकर यांच्या पत्नी पूजा यांनी सांगितलं की, ते स्वत: चालत गेले. त्यांचा ECG काढला गेला. डॉक्टरांनी त्यांना अॅडमिट होण्याचा सल्ला दिला. मग ते चंद्रा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाले. त्यांना नंतर अटॅक आला आणि पाच मिनिटांच्या आत त्यांचा मृत्यू झाला. आम्हाला तिथलं सीसीटीव्हीही दाखवला. त्यात सर्व दिसत आहे. आम्हाला काहीही शंका नाही. त्यांचा मृत्यू नैसर्गिक आहे, असं पूजा साईल म्हणाल्या.



राज्य सरकारने प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी- राष्ट्रवादी


राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटलं आहे की, कार्डिलिया ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने फर्जीवाडा करुन केलेल्या कारवाईतील एनसीबीचा पंच आणि एनसीबीचा फर्जीवाडा प्रतिज्ञापत्राद्वारे उघड करणारा प्रभाकर साईल याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची बातमी आहे. मात्र या मृत्यूमागे घातपाताची शक्यता असून राज्य सरकारने या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी तपासे यांनी केली आहे. आर्यन खान प्रकरणात एनसीबीने परवाच कोर्टाकडे चार्जशीट दाखल करण्यासाठी 90 दिवसाची मुदत मागितली होती मात्र कोर्टाने 60 दिवसात चार्जशीट दाखल करा असे आदेश दिले होते आणि आज मुख्य साक्षीदाराचा मृत्यू होतो यामागे नक्कीच काहीतरी दडलं आहे त्यामुळे याची कसून चौकशी झाली पाहिजे असेही महेश तपासे म्हणाले.



प्रभाकर साईलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू 


प्रभाकर साईलचा शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर किरण गोसावी चर्चेत आला. प्रभाकर साईल हा गोसावीचा बॉडीगार्ड होता.  


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha