मुंबई : मुंबईत लोकल अद्याप सर्वांसाठी खुली करण्यात आलेली नसल्यामुळे बेस्टवर प्रचंड ताण येत होता. अशातच बेस्टच्या मदतीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून एसटीच्या विविध विभागातून एसटी बसेस आणि सोबत त्या-त्या भागांतील एसटीचे काही कर्मचारी देखील सध्या मुंबईत सेवा देण्यासाठी हजर राहिले आहेत. मुंबईत आलेल्या या एसटी कर्मचाऱ्यांची राहण्याची, जेवणाची उत्तम सोय केल्याचा दावा एसटी प्रशासन गेल्या अनेक दिवसांपासून करत आहे. असं असलं तरी एसटी कर्मचाऱ्यांना उघड्यावर झोपावं लागत असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. अशातच आता एसटी कर्मचाऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा देखील निकृष्ठ असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे.


कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे मुंबई लोकल सेवा बंद करण्यात आली. अनलॉक प्रक्रियेत सर्व पूर्ववर्त करण्यासाठी बेस्ट सेवा सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली. परंतु, लोकल सेवा बंद असल्यामुळे बेस्ट सेवेवर संपूर्ण ताण पडत होता. त्यामुळे राज्यांतील प्रमुख एसटी बस डेपोमधून काही बसेस या मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. या सर्व बसेससोबत एसटी कर्मचारीही मुंबईत दाखल झाले आहेत. या कर्मचाऱ्यांची सोय अगदी उत्तम केल्याचा दावा सातत्यानं एसटी प्रशासन करत आहे. परंतु, सोशल मीडियावर एसटी कर्मचाऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या जेवणासंदर्भात व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे एसटी प्रशासनाच्या दाव्यां संदर्भात प्रश्न उपस्थित केला जात आहे.


मुंबईतील कुर्ला येथील हा व्हिडीओ असल्याचं सोशल मीडियावर सांगण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वीचा हा व्हिडीओ आहे. कर्मचाऱ्यांना जेवणासाठी आणलेला भात योग्य नसल्याचं या व्हिडीओत उपस्थित कर्मचारी सांगत आहेत. हा भात शिळा असून त्याला वास येत असल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे. असं अन्न खाऊन आम्ही आजारी पडायचं का? असा संतप्त सवालही या व्हिडीओत उपस्थित कर्मचारी विचारत आहेत.


पाहा व्हिडीओ : एसटी कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन देण्यासाठी एसटी महामंडळ दोन हजार कोटींचं कर्ज काढणार



कोरोनाच्या संकटाच्या काळात देखील एसटी कर्मचारी आपलं कर्तव्य निभावत आहेत. अगोदरच तीन महिन्यांत पेमेंट नसल्यानं आर्थिक विवंचनेत असलेल्या कर्मचाऱ्याला जेवण देखील योग्य मिळत नसल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, एसटी प्रशासन आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत खरोखरच किती गंभीर आहे. हे या व्हिडीओ वरून स्पष्ट होतंय, अशी प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांनी दिली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :