मुंबई : दरवर्षी प्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत केली जाणारी हंगामी तिकीट दरवाढ यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा दिवाळीच्या कालावधीत प्रवाशांना प्रचलित तिकीट दरानुसार संपूर्ण दिवाळी सुट्ट्यांमध्ये प्रवास करता येणार आहे. याबाबतची घोषणा आज परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या मान्यतेनुसार यात्रा, सणासुदीचा काळ, सलग सुट्ट्या, सप्ताह अशा गर्दीच्या काळात महसूल वाढीचा स्रोत म्हणून 30 टक्केपर्यंत हंगामी दरवाढ करण्याचे अधिकार एसटी महामंडळाला आहेत. त्यानुसार एसटी महामंडळ दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या कालावधीत सर्व बससेवा प्रकारासाठी 10 ते 15 टक्केपर्यंत तिकीट दरवाढ करून अतिरिक्त महसूल प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असते. परंतु यंदा मात्र कोविड - 19 च्या संकटात सर्वसामान्य प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड पडू नये म्हणून सामाजिक बांधीलकीचे भान ठेवत, दिवाळी सुट्टीच्या कालावधीतील अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
गेली अनेक महिने आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाने अशा बिकट परिस्थितीमध्ये अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द करून आपल्या " प्रवासी देवो भवः" या भूमिकेला साजेसा निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
'त्या' कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या उपचाराचा खर्च एसटी महामंडळ करणार
काही दिवसांपूर्वी सांगलीवरुन मुंबईत बेस्ट सेवेसाठी जे एसटी महामंडळातील कर्मचारी आले होते. त्या 400 कर्मचाऱ्यांची कोव्हिड-19ची टेस्ट करण्यात आली असून त्यातील 100 जण कोरोनाबाधित आहेत. सध्या यातील केवळ 9 जणांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली असून त्यांच्यावर सांगली येथे उपचार करण्यात येतं आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या कोरोना बाधित रुग्णांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च एसटी महामंडळाकडून करण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. यासोबतच जे 91 कोरोनाची लक्षणं न दिसणारी कर्मचारी आहेत त्यांच्यावर देखील उपचार सुरू असून त्यांना कॉरन्टाईन करण्यात आले आहे. यासोबतच आता मुंबईत बेस्ट सेवेसाठी जे कर्मचारी आणण्यात आले होते त्यांना आता पुन्हा माघारी पाठवण्यात आले आहे. मुंबईत एसटी महामंडळाचे सांगली विभाग सोडून इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले आहे आणि त्यांच्या माध्यमांतून प्रवाशांची सेवा सुरू आहे.