नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाहीत. त्यांनी मंगळवारी (27 एप्रिल) ट्वीट करुन ही माहिती दिली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्यानंतर प्रशांत किशोर यांना काँग्रेसची ऑफर आवडली नाही. 16 एप्रिलपासून आतापर्यंत प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधी यांच्यासोबत अर्धा डझनहून अधिक बैठका केल्या, पण निकाल शून्य लागला आणि प्रशांत किशोर यांनी हातमिळवणी न करण्याचा निर्णय घेतला. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सर्वप्रथम प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये जाणार नसल्याची माहिती दिली.
ते म्हणाले की, "प्रशांत किशोर यांचं प्रेझेन्टेशन आणि चर्चेनंतर काँग्रेस अध्यक्षांनी एक सक्षम कृती गट 2024 ची स्थापना केली. त्यानंतर त्यांना निश्चित जबाबदारीसह पक्षात सामील होण्यासाठी आमंत्रित केलं, परंतु त्यांनी नकार दिला. आम्ही त्यांच्या प्रयत्नांचे आणि त्यांच्या सल्ल्याचे कौतुक करतो.
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांना रणदीप सुरजेवाला बोलत असलेल्या एम्पॉवर्ड अॅक्शन ग्रुपचा सदस्य बनण्याची ऑफर मिळाली होती, जी त्यांनी नातारली. सूत्रांचं म्हणणं आहे की, प्रशांत किशोर यांची काँग्रेस नेतृत्वाशी एका मोठ्या पदासाठी चर्चा सुरु होती, त्यामुळे त्यांना केवळ एका समितीचा सदस्य बनवण्याचा प्रस्ताव पीके यांना रुचला नाही.
प्रशांत किशोर यांनी देखील ऑफर नाकारल्यावर ट्वीट करत म्हटलं की, "मी काँग्रेसमध्ये येण्यास आणि निवडणुकीची जबाबदारी घेण्यास नकार दिला. परिवर्तनात्मक सुधारणांद्वारे खोलवर रुजलेल्या संरचनात्मक समस्यांचं निराकरण करण्यासाठी पक्षाला माझ्यापेक्षा नेतृत्वाची आणि सामूहिक इच्छाशक्तीची गरज आहे, असं मला वाटतं.
समितीच्या पदाव्यतिरिक्त प्रशांत किशोर यांचं काँग्रेसमध्ये सहभागी न होण्याचं आणखी एक कारण त्यांची ipac ही संघटना असल्याचं बोललं जात आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये प्रशांत किशोर यांचे नेते आणि पक्षांशी चांगले संबंध आहेत, जिथे काँग्रेसची त्यांच्याशी थेट स्पर्धा आहे.
संबंधित बातम्या
Prashant Kishor : काँग्रेसला संपू देणार नाही,'हात' बळकटीसाठी प्रशांत किशोर यांची 'ब्लू प्रिंट'