Prashant Kishor News : सध्या काँग्रेसमध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. काँग्रेसचा पक्षांतर्गत बांधणी करण्यावर भर देण्याचा प्रयत्न सुरु आहे. यामध्ये निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रशांत किशोर यांनी त्यांची ब्लू प्रिंट दिली आहे. त्यांनी काही सुचनाही केल्या आहेत. यासंदर्भात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्थापन केलेल्या आठ नेत्यांच्या समितीने किशोर यांच्या धोरणात्मक योजनेवर तपशीलवार चर्चा केली आहे. यांसदर्भात काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांच्यासमोर या सर्व सूचना मांडल्या आहेत.
येणाऱ्या सर्वच सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात प्रशांत किशोर यांच्या चर्चा करण्यात आली. त्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या एका गटाने किशोर यांच्या शिफारशी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्या आहेत. त्यावर निर्णय घेण्याचे काम सोनिया गांधी यांच्यावर सोडले आहे. त्यादृष्टीने पक्षात संघटनात्मक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आठ नेत्यांच्या समितीने केली सविस्तर चर्चा
काँग्रेस अध्यक्षांनी स्थापन केलेल्या आठ नेत्यांच्या समितीने किशोर यांच्या धोरणात्मक योजनेवर सविस्तर चर्चा केली. तसेच या समितीने अनेक वरिष्ठ नेत्यांशी देखील चर्चा केली. त्यानंतर सोनिया गांधींना त्यांच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, सोमवारी पक्षाच्या काही नेत्यांची पुन्हा बैठक होणार आहे. पक्षाच्या पुनरुज्जीवन आणि रणनिती योजनेवर या बैठकीत अधिक चर्चा होणार आहे.
प्रशांत किशोर यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यावर काही नेत्यांनी आक्षेप घेतल्याची देखील माहिती मिळत आहे. कारण त्यांनी भाजप, जेडीयू, टीएमसी यासह अनेक राजकीय पक्षांसोबत काम केले आहे. काही नेत्यांनी आक्षेप घेतला असला तरी अंतिम निर्णय काँग्रेस नेतृत्व घेणार आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार दिग्विजय सिंह यांच्यासारख्या काही ज्येष्ठ नेत्यांनी किशोर यांनी ठोस धोरणात्मक योजना आणली असल्याचे म्हटले आहे. किशोर यांच्या योजनेवर समितीने अधिक चर्चा केली आहे असून, पक्षाला मदत होईल, असे त्यांनी सांगितले आहे.
समितीमध्ये कोणते नेते आहेत
सोनिया गांधी स्थापन गठित केलेल्या समितीमध्ये खासदार दिग्विजय सिंह, प्रियंका गांधी, अंबिका सोनी, केसी वेणुगोपाल, मुकुल वासनिक, जयराम रमेश, पी चिदंबरम आणि रणदीप सुरजेवाला यांचा समावेश आहे. सोनिया गांधींनी स्थापन केलेल्या पॅनेलची अनेक तास बैठक झाली. या आठवडाभरात वरिष्ठ नेत्यांमध्ये अनेक वेळा चर्चा झाल्या.