Prashant Kishor : सध्या पक्ष मजबूत करण्यासाठी काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. यामध्ये निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी आखलेल्या रणनितीबाबत पक्षात विचारविनिमय सुरु आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला मरण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. काँग्रेसचा विचार देशातून मरु शकत नाही असे वक्तव्य प्रशांत किशोर यांनी केले आहे. काँग्रेसचं अस्तित्व चिरकालीन आहे, ते संपू देणार नसल्याचे किशोर म्हणाले. दरम्यान, प्रशांत किशोर हे लवकरच काँग्रेसमध्ये देखील प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. कारण प्रशांत किशोर यांची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाच्या इतर प्रमुख नेत्यांसोबत बैठक झाली आहे. यामध्ये त्यांनी रणनितीबाबत सादरीकरण देखील दिले आहे.
दरम्यान, सातत्याने काँग्रेसला पराभवाचे धक्के बसत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवला सामोरं जाव लागले होते. त्यानंतर पक्षाची ताकद कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश देखील केला होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीमध्ये देखील काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला आहे. या पाचपैकी पंजाब हे एकमेव काँग्रेसच्या हाती असलेल्या राज्यात देखील काँग्रेसला धक्का बसला आहे. त्याठिकाणी आम आदमी पार्टीने वर्चस्व निर्माण केलं आहे. असा स्थितीत काँग्रेसची पुन्हा ताकद वाढवण्यासाठी, काँग्रेसला वैभव मिळवून देण्यासाठी पक्षात हालचाली सुरु आहेत. यामध्ये प्रशांत किशोर महत्वाची भुमिका निभावणार असल्याचे चर्चा सुरु आहे. प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी ब्लू प्रिंट दिल्याची माहिती देखील मिळत आहे.
प्रशांत किशोर यांनी केलेल्या सादरीकरणात काँग्रेसची सध्याची्या स्थितीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तसेच त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीची ब्लू प्रिंट दिली आहे. यामध्ये त्यांनी भारताची लोकसंख्या, काँग्रेस खासदार, आमदारांची संख्या, महिला, तरुण, छोटे व्यापारी आणि शेतकरी या मुद्यांवर प्रकाश टाकला आहे. तसेच प्रशांत किशोर यांनी 2024 मध्ये प्रथमच 13 कोटी मतदार मतदान करणार आहे, त्या मतदारांवरही लक्ष केंद्रीत केले आहे.
दरम्यान, सध्या लोकसभा आणि राज्यसभेत काँग्रेसचे फक्त 90 खासदार आहेत. तर देशात काँग्रेसचे 800 आमदार असल्याचे प्रशांत किशोर यांनी सांगितले. काँग्रेस सध्या तीन राज्यात सत्तेत आहे, तर आणखी तीन राज्यांमध्ये आघाडी सरकारचा भाग आहे. 13 राज्यांमध्ये काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे. दरम्यान, 1984 पासून काँग्रेसच्या मतांची टक्केवारी कमी होत चालली असल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.
प्रशांत किशोर यांचे काँग्रेसला सल्ले
1. नेतृत्वाबाबत काँग्रेसने निर्णय घेण्याची गरज, नेतृत्वाचे संकट दूर करावे
2. युतीचे प्रश्न सोडवणे आवश्यक आहे
3. पक्षाने आपल्या पूर्वीच्या आदर्शांकडे परत यावे
4. काँग्रेसला तळागाळातील आपले कार्यकर्ते आणि नेत्यांना एकत्र करावे लागेल
5. काँग्रेसने आपल्या संपर्क प्रणालीमध्ये फेरबदल करण्याची गरज आहे