Prashant Kishor : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसने आता 2024 ची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पक्षात अनेक बदल सुचवण्यात आले असून निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भूमिका सर्वात महत्त्वाची मानली जात होती. मात्र, आता प्रशांत किशोर यांनी काँग्रेस कमिटीत येण्यास नकार दिल्याची माहिती मिळाली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 


काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 2024 साठी एक कृती गट तयार केला होता. प्रशांत किशोर यांनाही या गटाचा भाग बनून सर्व जबाबदाऱ्या स्वीकारण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र, प्रशांत किशोर यांनी काँग्रेसची ही ऑफर स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा आणि पक्षाला दिलेल्या सूचनांचा आम्ही आदर करतो, असे रणदीप सिंग सुरजेवाला यांनी म्हटले आहे.  






प्रशांत किशोर यांनीही ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, निवडणुकीची जबाबदारी स्वीकारण्याची काँग्रेसची मोठी ऑफर मी नाकारली आहे. खोलवर रुजलेल्या संरचनात्मक समस्या सोडवण्यासाठी पक्षाला सक्षम नेतृत्व आणि सामूहिक इच्छाशक्तीची जास्त गरज आहे. " 






प्रशांत किशोर यांनी या पूर्वी काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यातून सोनिया गांधी यांना आगामी निवडणुकांबाबत काही सूचना देण्यात आल्या होत्या. सोनिया गांधी यांनी स्वतः प्रशांत किशोर यांची अनेक वेळा भेट घेतली होती. यानंतर काँग्रेस लवकरच प्रशांत किशोर यांच्याकडे पक्षातील महत्त्वाचे पद सोपवू शकते, असे बोलले जात होते. मात्र, आता प्रशांत किशोर यांनी काँग्रेसची ही ऑफर नाकारली आहे.   


दरम्यान, 13 ते 15 मे या कालावधीत राजस्थानमधील उदयपूर येथे काँग्रेसचे चिंतन शिबिर आयोजित केले जाणार आहे. तब्बल 9 वर्षांनंतर पक्षातर्फे अशा प्रकारचे चिंतन शिबिर आयोजित केले जात आहे. विशेष म्हणजे यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 6 समित्यांमध्ये काँग्रेसच्या नाराज जी-23 नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रशांत किशोर यांच्या सांगण्यावरूनच हे करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. कारण त्यांनी स्वतः G-23 च्या काही नेत्यांची भेट घेतली होती.