मुंबई : बीडीडी चाळीत 30 वर्षांपासून राहणाऱ्या पोलिसांना घरे तयार झाल्यावर हस्तांतरित करावीत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज मंत्रालयात आयोजित बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाबाबत बैठकीत बोलत होते. यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर उपस्थित होते.

“बीडीडी चाळीत गेल्या 30 वर्षांपासून जवळपास 2 हजार 950 पोलीस कुटुंबीय राहतात. म्हाडाची घरे तयार झाल्यावर त्यापैकी 2 हजार 950 घरे गृह विभागाला हस्तांतरित करावीत. घरे देताना त्याचे निकष काय असावेत, याचा निर्णय गृह विभागाने घ्यावा.”, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला.

त्याचबरोबर, 1996 नंतर बीडीडी चाळीत अनधिकृत राहणाऱ्या कुटुंबांना काही दंड आकारुन त्यांनाही नियमित करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. तसेच म्हाडाची घरांची कामे तातडीने सुरु करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

या  बैठकीला मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, गृहनिर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय कुमार यांच्यासह संबंधित विभागांमधील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.