मुंबई :  कोरोनाकाळात पोलिस बांधव वॉरिअर्स बनून दिवसरात्र कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी उभे आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता ते रस्त्यावर आहेत. अशा काळात पोलिसांना सलाम ठोकला जात आहे. मात्र दुसरीकडे त्यांना संकटात असताना देखील वेळेवर मदत मिळत नसल्याचं एक उदाहरण समोर आलं आहे. खेरवाडी वांद्रे मुंबई येथे कर्तव्यावर असताना पोलीस शिपाई शंकर बाजीराव मगर यांचा अपघात झाला. या अपघातात मगर यांचा पाय मोडून पूर्णपणे वाकडा झाला होता. त्यामुळे इतर सहकाऱ्यांनी तातडीनं रुग्णालयात नेण्यासाठी पळापळ सुरु केली. 


खेरवाडीजवळ भाभा रुग्णालय असल्यानं मगर यांना आधी तिकडं नेण्यात आलं. अपघात गंभीर असल्या कारणानं भाभा रुग्णालयानं दुसरीकडे नेण्याचा सल्ला दिला. तिथल्या डॉक्टरांनी तोपर्यंत प्रथमोपचार केले, या प्रथमोपचारात वाकडा झालेल्या पायाला फक्त सपोर्ट आणि पांढरी पट्टी बांधली गेली. त्यानंतर पोलिसांच्या मेडिक्लेममध्ये बसणारं रुग्णालय म्हणून वोक्हार्ट रुग्णालयाकडे धाव घेतली पण वोक्हार्ट रुग्णालयानं दिलेली वागणूक अतिशय लज्जास्पद होती. 
          
पोलीस शिपाई मगर यांच्यावर तातडीनं ॲापरेशनची गरज होती त्यासाठी सर्व पोलीस सहकारी धावपळ करत होते. मात्र त्यावेळी वोक्हार्टवाल्यांनी जे काही सांगितले ते ऐकून पोलीस हादरून गेले.  'अपघात झालेल्या व्यक्तीचा RTPCRचा रिपोर्ट द्या, तरच उपचार करणार, असं त्यांना सांगण्यात आलं. हे ऐकून सर्व पोलीस चिंतेत पडले. वरिष्ठ पोलीस येऊन डाॅक्टरांना विनंती करत होते, दोन वरिष्ठ पोलीसांनी डॅाक्टरांसमोर हात जोडले तरीही डॉक्टरांनी टेस्टची मागणी केली. या घटनेनंतर आणखी काही वरिष्ठ अधिकारी आले वोक्हार्टवाल्यांनी विनंती करू लागले पण तरीही रुग्णालय प्रशासन ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.


अपघात झालेल्या रुग्णाला RTPCR टेस्टची मागणीच कशी करू शकतात? अपघात झालेल्या व्यक्ती RTPCR टेस्ट गरजेची असली तर तो टेस्ट कशी करणार? RTPCR चा रिपोर्ट यायला किमान एक दिवस लागतो, मग तोपर्यंत रुग्णावर उपचार करणार नाही का? अपघात ग्रस्त मगर पायाच्या अपघाताने अक्षरश: रडत होते. कळवळत होते पण  वोक्हार्टवाल्यांनी जराही खाकी वर्दीला दया दाखवली नाही. 


या वेळेत जर अपघातग्रस्त पोलीस शिपाई यांचे काही बरं वाईट झालं असतं तर? वोक्हार्ट रुग्णालयानं दिलेली वागणूक योग्य होती का? पोलिसांना जर अशी वागणूक असेल तर सामान्य लोकाचं काय? अशा हलगर्जीपणा करणाऱ्या डॅाक्टरवर गुन्हा दाखल होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. 


वोक्हार्टवाल्यांचं काय म्हणणं आहे? 


या रुग्णालयाशी एबीपी माझानं संपर्क केला असताना सुरुवातीला त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. त्यानंतर ही बातमी न दाखवण्यासाठी वारंवार फोन आणि दबावतंत्र सुरु होतं. त्यानंतर रुग्णालयाकडून हास्यास्पद स्पष्टीकरण आलं ज्यात या घटनेचा कोणताही उल्लेख केलेला नव्हता.  सर्व प्रकारचे साथीचे आजार तसेच अन्य आजारपणात वोक्हार्ट रुग्णालय नेहमीच उपचार देण्यासाठी अग्रेसर राहिली आहेत.  मुंबई पोलिस आणि इतर सर्व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे COVID आणि कोविडशिवाय अन्य आजारांवर उपचार करण्यास वोक्हार्ट रुग्णालयानं पाठिंबा दिला आहे, असं स्पष्टीकरण वोक्हार्ट हॉस्पिटलनं दिलं आहे.